अभ्यासासाठी आई सतत रागावते या कारणावरून १५ वर्षाच्या मुलीने आईची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी आईच्याच मोबाईलवरून मामाला मेसेज केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील ऐरोली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी १५ वर्षाच्या मुलीविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मुलीला अटक करून तिची रवानगी महिला बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
शिला जाधव(काल्पनिक नाव)(४७) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. शिला या पती, १५ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासह नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर नंबर ७ येथे एका इमारतीत राहत होत्या. मुलीने डॉक्टर व्हावे अशी आई वडिलांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी मुलीचे नीट (एनआयआयटी)चे क्लास सुरू केले होते. मुलीने अभ्यास करावा व चांगल्या मार्काने पास व्हावे म्हणून आई शिला मुलीला सतत अभ्यास करण्यासाठी ओरडत असायची.
असा आहे घटनाक्रम
३० जुलै रोजी दुपारी शिलाच्या मोबाईल क्रमांकावरून ‘आय ट्रायड एव्हरीथिंग, आय क्वीट’ (I tried everything I quit) असा मेसेज शिला हिचा भाऊ,पती आणि बहिणीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आला होता. दरम्यान जवळच राहणा-या भावाने बहिणीच्या घरी धाव घेतली असता, १५ वर्षांची भाची आणि ६ वर्षांचा भाचा हे दोघे घरी रडत होते. आई बेडरूमचे दार उघडत नाही, असे त्यांनी आपल्या मामाला सांगितले. त्यानंतर मामाने बेडरुमचे दार तोडून आत प्रवेश केला असता, बहीण शिला बेडवर निपचित पडली होती. तिच्या गळ्याभोवती कराटेचा बेल्ट, फास लावलेल्या अवस्थेत होता. तिच्या भावाने गळ्याभोवती असलेली बेल्टची गाठ सोडवली. या घटनेची माहिती रबाळे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिलाला ताबडतोब वाशी येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पुरावे हाती लागत नसल्याने संशय
पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात शिला यांचा मृत्यू गळा आवळून झाला असून, तिच्या डोक्याला जखम असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी संशयावरुन तपास सुरू करुन चौकशी सुरू केली. घरातील कुठली वस्तू चोरीला गेली का? घरी दुसरे कोणी आले होते का? पती कुठे होते याबाबत सविस्तर चौकशी केल्यानंतर देखील पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागत नव्हते. मात्र शिला यांच्या १५ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद वागण्यावरून महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन, तिच्याकडे कसून चौकशी केली.
मुलीने दिली कबुली
त्यावेळी मुलीने गुन्हा कबूल करुन “होय मीच आईचा खून केला, आई मला सतत अभ्यासासाठी ओरडत असायची आणि घटनेच्या दिवशी आईने मला मारहाण केली व त्यावेळी तिच्या हातात स्वयंपाक घरातील चाकू होता. मी घाबरले आणि आईला जोरात धक्का दिला, तेव्हा आईच्या डोक्याला बेडचा कोपरा लागला आणि आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर मी कराटेचा बेल्ट घेऊन आईचा गळा आवळला. आईने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी तिच्याच मोबाईलवरून वडील, मामा आणि मावशीला मेसेज केला” अशी कबुली ताब्यात घेतलेल्या १५ वर्षीय मुलीने पोलिसांना दिली. तिचा जबाब ऐकून पोलिस देखील हादरले. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी मुलीविरुद्ध आईचा खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, तिची रवानगी महिला बाल सुधारगृह येथे करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community