संरक्षण भिंत बांधल्यानंतरही National Park मध्ये अतिक्रमण

61
संरक्षण भिंत बांधल्यानंतरही National Park मध्ये अतिक्रमण
संरक्षण भिंत बांधल्यानंतरही National Park मध्ये अतिक्रमण

नॅशनल पार्कमधील वन जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र, त्यानंतही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची कबुली वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik ) यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, सरकारने अशांसाठी एसआरएमार्फत (SRA) चांदिवली (Chandivali) येथील संघर्षनगर येथे पहिल्या टप्प्यात ११ हजार ३५९ कुटुंबांना घरे बांधली. तर २९९ जणांना घरे देणे शिल्लक असल्याचे ते म्हणाले. तर दुसऱ्या टप्प्यातील १३ हजार ४८६ कुटुंबाना घरे देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अपात्रांचे ठाणे जिल्ह्यांत पुनर्वसन केले जाणार आहे, अशी माहिती नाईक (Ganesh Naik ) यांनी दिली.

( हेही वाचा : Election Commission ला लक्ष्य करणाऱ्या पक्षांना नोटीस; समस्यांवर मागवल्या ३० एप्रिलपर्यंत सूचना

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (National Park ) झोपडीधारकांचे पुनर्वसन रखडले आहे. सरकारने त्याबाबत काय पावले उचलली आहेत, घरे कधी मिळणार, पुनर्वसन कसे करणार त्याचबरोबर टीडीआरचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न सदस्य राजहंस सिंह (Rajhans Singh) यांनी लक्षवेधी मांडून केला. वनमंत्री नाईक यांनी त्यावर उत्तर देताना, नॅशनल पार्कमधील ४५ आदिवासी पाड्यांतील २ हजार कुटुंबांचे आणि पात्र झोपडीधारकांचे आरे काॅलनीतील ९० एकरमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र, हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे पालिकेकडून झोनल मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. हा मास्टर प्लॅन तयार झाला की, त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यात नॅशनल पार्कमधील रहिवाशांसाठी पुनर्विकास विकासक डीबी रिअॅलिटीकडून केली जाणार होती. त्यासाठी त्यांना टीडीआर देण्यात आला होता. मात्र, आता विकासक डीबी रिअॅलिटी यातून बाहेर पडली आहे. यात मोठा टीडीआर घोटाळा झाला असून याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी भाई जगताप (Bhai Jagtap ) यांनी केली. यात टीडीआर घोटाळा झाला असेल तर चौकशी करू, असे आश्वासन नाईक (Ganesh Naik ) यांनी दिले.

म्हाडा पुनर्विकास प्रकल्प राबवणार

नॅशनल पार्कमधील रहिवाशांचे या आधीच्या पुनर्वसन प्रकल्पात निकृष्ट दर्जाची घरे मिळाली आहेत. त्यामुळे लोक पुनर्वसन प्रकल्पासाठी पुढे येत नाहीत. त्यांची अवस्था वाईट आहे, अशी माहिती सचिन अहिर यांनी परिषदेत दिली. त्यावर ही बाब खरी असून या पुढील पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबवू, अशी ग्वाही नाईक (Ganesh Naik ) यांनी दिली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.