-
ऋजुता लुकतुके
देशातील एक मोठी खाजगी बँक असलेल्या इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये (IndusInd Bank Share Price) या आठवड्यात मोठी पडझड झाली आहे. सोमवारी (११ मार्च) हा शेअर तब्बल २७ टक्क्यांनी खाली आला. आणि बुधवारीही पडझड सुरूच असल्याचं चित्र होतं. बँकेच्या अकाऊंटिंगमध्ये अनियमितता असल्याचं समोर आल्यानंतर ही पडझड होत आहे. नक्की हे प्रकरण काय आहे, ते समजून घेऊया,
इंडसइंड बँकेनं परकीय चलन बाजारातील वायदे सौद्यांच्या व्यवहारांची नोंद घेण्यामध्ये केलेली चूक बँकेला महागात पडली आहे. बँकेच्या फोरेक्स व्यवहारांमधील (Forex trading) चुका सुधारल्यानंतर कंपनीला १,५०० ते २,००० कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो. या प्रकारामुळे बँकेचं एकूण मूल्य तब्बल २.३५ टक्क्यांनी खाली येऊ शकतं. तर दोन दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे आधीच कंपनीचं भाग भांडवल १९,०५२ कोटी रुपयांनी खाली आलं आहे.
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?)
रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) अलीकडेच सर्व बँकांना इतर मालमत्ता व इतर दायित्व या सदरातील अकाऊंटमधील नोंदी पुन्हा तपासण्याचे आदेश दिले. हे सुधारित ऑडिट रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank) सादरही करायचं होतं. हे ऑडिट पुन्हा करताना इंडसइंड बँकेला फॉरेक्स वायदे व्यवहारांमधील काही नोंदींमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या.
बँकेनं या त्रुटी इतके दिवस का लपवून ठेवल्या. आणि त्यांना या त्रुटींचा अंदाज नेमका कधी आला याविषयीही स्पष्टता नसल्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन शेअरमध्ये गेले दोन दिवस मोठी घसरण दिसून आली आहे. ‘फॉरेक्स व्यवहारांमध्ये (Forex trading) झालेला तोटा बँकेनं आधीच जाहीर करायला हवा होता,’ असं जाणकारांचं याविषयी मत पडलं. आता हा प्रकार उशिरा उघड झाल्यानंतर देशातील मुख्य संशोधन संस्थांनी इंडसइंड बँकेच्या शेअरवरील रेटिंग (IndusInd Bank Share Price) कमी केलं आहे. मोतीलाल ओस्वाल, जेफरीज तसंच नुवामाने या शेअरला डिरेट केलं आहे.
(हेही वाचा – Virat, Rohit Not Retiring : ‘हम कोई रिटायर नही हो रहे!’ रोहित, विराटचं बोलणं व्हायरल)
आधीच गेल्यावर्षभरात या शेअरमध्ये जवळ जवळ ५० टक्क्यांची घसरण झाली आहे. तर २०२५ सुरू झाल्यापासून शेअरमध्ये ३२ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत काठपालिया (Sumant Kathpalia) यांनी ही समस्या एका तिमाहीत सुधारू असं म्हटलं आहे. ‘ही एकदाच येणारी अकाऊंटिंग समस्या आहे. ती नेहमी त्रास देणारी नाही. त्यामुळे जुने अकाऊंट सुधारले की, समस्या दूर होऊ शकेल. आणि बँक एका तिमाहीत पुन्हा नफ्यात येईल,’ असा विश्वास काठपालिया यांनी व्यक्त केला आहे.
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community