-
साक्षी कार्लेकर
होळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते रंगांची उधळण, ‘बुरा ना मानो होली है’ असे ओरडणे आणि पुरणपोळी. पण हा सण एवढ्यापुरताच मर्यादित नाही ! उत्सवांना साजरे करण्यासाठी प्रत्येक प्रदेशाच्या स्वतःच्या परंपरा असतात. जसे, महाराष्ट्रात या सणाला होळी म्हणतात तर कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. कोकणात शिमगोत्सव हा त्या-त्या गावातील परंपरेनुसार तीन, पाच, सात, बारा, पंधरा दिवस सुरू असतो. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेला रात्री होम केला जातो. तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो. याला ‘भद्रेचा होम’ असे म्हणतात. (Holi Festival 2025)
(हेही वाचा – Legislative Assembly : विवाहित महिलांपुढे प्रश्न; नाव लावायचे कुणाचे? आईचे की नवऱ्याचे की दोघांचे??)
होळीच्या आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून गावकऱ्यांचे मनोरंजन करणे, जाखडी नृत्य, पुरुषमंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. या प्रकाराला वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपारिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात. होळीच्या दिवसाची सुरूवात होते ती देवाचा कौल घेऊन. होळीच्या दिवशी गावचे मानकरी एकत्र येऊन देवाचा कौल घेतात. देवाने कौल दिल्यानंतर शिमगा उत्सवाला सुरूवात होते. गावकरी देवाचे निशाण घेऊन होळी तोडायला जातात. या होळीला ‘देव होळी’ असे म्हणातात. ‘देव होळी’ नंतर ‘गाव होळी’ उभी केली जाते. या होळींना आंब्याचे टाळे लावले जाते. होळीजवळ पूजा केली जाते. गाऱ्हाणं घातलं जातं. गाव होळीमध्ये एक भक्ष द्यावा लागतो. होळी पेटवल्यानंतर यामध्ये एक कोंबडीचे पिल्लू सोडले जाते. याबद्दल विशेष असे की, या ३० ते ३५ फूट उंच होळीत सोडलेले भक्ष ही होळी पार करून चक्क जिवंत बाहेर येतं. (Holi Festival 2025)
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ)
गावाचे मानकरी, पुजारी, गावातील मंडळी एकत्र येऊन देवांना सजवतात, पालखी सजवली जाते आणि सुरूवात होते शिमगोत्सवाला. पालखी सजवल्यानंतर देवासमोर ‘जत’ म्हटला जातो. (हे एक विशेष प्रकारचं लोकगीत आहे.) यानंतर पालखी ग्रामदेवतांच्या भेटीला निघते. या भेटीतही ‘जत’ म्हटला जातो. ‘जत’ म्हणताना गावकरी इतर देवांना उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देत असतात. इतर वेळी आपण देवाच्या भेटीसाठी जात असतो, पण जेव्हा देव आपल्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घरी येतो तो आनंद खास असतो. (Holi Festival 2025)
(हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ॲप विकसित करणार; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची माहिती)
‘शिंपणे’ म्हणजे शिमग्याचा समारोप
गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी निघते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानल जातं. देव आपल्या घरी येणार हा आनंद काही औरच असतो. घरासमोरील खळा (घरासमोरील अंगण) शेणाने सारवला जातो. त्यावर रांगोळी काढून, गोडाधोडाचा नैवेद्य देवाला दाखवून पूजा केली जाते. देवाच्या पालखीसोबत देवाचे निशाण आणि पाच खांब असतात. देवाचे निशाण हे घरातील तुळशीसमोर ठेवून त्याची पुजा केली जाते. पालखी घरात घेण्यापूर्वी पायावर पाणी दिले जाते. घरातील महिला पालखीची आस्थेने ओटी भरतात. यावेळी पालखी सोबत असणाऱ्या गावकरी मंडळींना प्रसादाच्या रुपात लाडू, पेढे वाटले जातात. प्रत्येक घरातून आपल्या इच्छेनुसार प्रसाद वाटला जातो. शिवाय खास म्हणजे, पॅास वाटणे (पैसे वाटणे) ही पालखी सोहळ्यात पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. शिमग्याचा समारोप हा ‘शिंपणे’ या कार्यक्रमाने होतो. ‘शिंपणे’ म्हणजे चुना, तंबाखू मिश्रीत लाल रंगाचे पाणी. ज्या-ज्या घरी पालखी जाते, त्या – त्या घरातील तुळशीत हे पाणी घातले जाते. तीर्थाप्रमाणे हे पाणी पिण्याससुद्धा आणि अंगावर शिंपडण्यास योग्य असते. शिमग्याचा शेवटच्या दिवशी हेच पाणी शिंपडले जाते, ज्यास ‘शिपणं’ असं म्हणतात. (Holi Festival 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community