आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन!

डॉ. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले होते.

134

प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे मंगळवारी, १० ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील आणि संजय, मुलगी स्नुषा व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले होते.

गर्भसंस्कारावरील पुस्तकांचे सहा भाषांमध्ये भाषांतर

तांबे यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. विशेष म्हणजे त्यांचे इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.

(हेही वाचा : मंत्रालयात गटारी! कुणी रिचवल्या बाटल्या?)

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठे काम केले! – उपमुख्यमंत्री

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनर्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचे महत्व घराघरात पोहचवले. स्वयंपाक घरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातले ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.