IPL 2025 : कोलकाताने अजिंक्य रहाणेला कर्णधार का केलं?, ऐका सीईओनं दिलेलं कारण

IPL 2025 : वेंकटेश अय्यरऐवजी फ्रँचाईजीने रहाणेची कर्णधार म्हणून निवड केली.

285
IPL 2025 : कोलकाताने अजिंक्य रहाणेला कर्णधार का केलं?, ऐका सीईओनं दिलेलं कारण
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलचा नवीन हंगाम एका आठवड्यात सुरू होईल. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनी यंदा एक धाडसी निर्णय घेतला आहे, ३७ वर्षीय अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा. खेळाडूंच्या लिलावात कोलकाता फ्रँचाईजीने वेंकटेश अय्यरसाठी २३.७५ कोटी रुपये खर्च केले आणि त्याला परत आपल्या ताफ्यात घेतलं. याउलट रहाणे फ्रँचाईजीच्या सुरुवातीच्या रणनीतीत बसत नव्हता. दुसऱ्या फेरीत त्यांनी मूलभूत किंमत देऊन रहाणेला करारबद्ध केलं. अशावेळी कर्णधार म्हणून दोघांची नाव चर्चेत असली तरी वेंकटेश अय्यरला वय आणि कारकीर्द पाहता झुकतं माप मिळेल असा अंदाज असताना त्यांनी अजिंक्य रहाणेची निवड या हंगामाचा कर्णधार म्हणून केली आहे. (IPL 2025)

अय्यरची पुन्हा कोलकाता संघात वर्णी लागल्यानंतर त्यानेही नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यास त्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. पण, आता रहाणे संघाचा कर्णधार असणार आहे आणि हा निर्णय का घेतला, याविषयी कोलकाता फ्रँचाईजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकी मैसुरे यांनी सांगितलं आहे. ‘अजिंक्य अनुभवी आहे आणि वेंकटेशवर कप्तानीचं ओझं पडू नये, त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करता यावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला,’ असं मैसुरे यांनी स्पष्ट केलं आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमधून माघार घेणाऱ्या हॅरी ब्रूकवर दोन वर्ष बीसीसीआयने केली निलंबनाची कारवाई)

‘आयपीएल ही खूप कठीण स्पर्धा आहे. यात आव्हानं मोठी आहेत. कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे खेळाडूवरील दडपण कसं आणि किती वाढतं याचा अनुभव यापूर्वी संघ म्हणून आम्ही घेतला आहे. आता आम्हाला ते टाळायचं होतं. वेंकटेश अय्यर नवोदित खेळाडू आहे. उलट अजिंक्यला कप्तानीचं दडपण हाताळण्याचीही सवय आहे. कप्तान म्हणून आव्हानं पेलण्यासाठी जी स्थिरता, अनुभव आणि प्रगल्भता लागते, ती अजिंक्यकडे आहे. म्हणून आम्ही त्याची निवड केली,’ असं मैसुरे यांनी क्रिकइन्फो वेबसाईटशी बोलताना सांगितलं. (IPL 2025)

अजिंक्य रहाणे दीर्घ काळ भारतीय संघातून खेळला आहे आणि ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्याने यात ८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियात मेलबर्न कसोटीतील विजय हा त्याच्या कप्तानीचा परमोच्च बिंदू मानला जातो. तर आयपीएलमध्येही तो राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपरकिंग्ज, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे आणि यातील राजस्थान आणि पुणे फ्रँचाईजींचं त्याने पूर्वी नेतृत्वही केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो एक नावाजलेला कर्णधार आहे. (IPL 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.