
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत सध्या सिमेंट काँक्रिटची कामे असून आता पर्यंत ५० टक्के सिमेंट काँक्रिटची कामे पूर्ण झाली आहे. आता ५० टक्के कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या अभियंत्यासाठी विचार मंथन कार्यशाळेचे आयोजन करून काँक्रिट रस्त्याच्या आराखड्याबाबत तंत्रज्ञानाची माहिती आणि निकष, मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ या अनुषंगाने सुयोग्य तंत्रज्ञान, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती, चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याच्या आयुर्मनात होणारी वाढ, प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांना मार्गदर्शन केले. (CC Road)
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे मध्यावस्थेत आहेत. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी, मुंबई) तज्ज्ञांचा चमू, गुणवत्ता तपासणी संस्थेचे (क्यूएमए) प्रतिनिधी आदी प्रत्यक्ष कार्यस्थळास भेट देऊन महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत आहेत. या निरीक्षणांवर चर्चा करण्याबरोबर रस्ते कामांची अत्युच्च गुणवत्ता, कामांमध्ये येणारी आव्हाने, अभियंत्यांच्या शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची विचारमंथन कार्यशाळा पवई स्थित भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथे गुरुवारी १३ मार्च २०२५ रोजी पार पडली. त्यावेळी बांगर हे संबोधित करत होते. (CC Road)
(हेही वाचा – संजय राऊतांनी सकाळचा शिमगा बंद करावा; Chandrashekhar Bawankule यांची टीका)
आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्राध्यापक डॉ. के. व्ही. कृष्णराव, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख टॉम मॅथ्यू, अधीक्षक प्राध्यापक पी. वेदगिरी, सहायक प्राध्यापक सोलोमन डिब्बार्म,महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महानगरपालिका अभियंते तसेच गुणवत्ता तपासणी संस्था, कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी असे एकूण ३०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) कार्यशाळेत अभियंत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अनेक प्रश्न विचारले. अभियंत्यांच्या विविध शंकाचे निरसन प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव, प्रा. सोलोमन डिब्बार्म यांनी केले. (CC Road)
येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे अधिक गतीने राबविली जाणार आहेत. त्याचवेळी गुणवत्तेवरदेखील भर दिला जात आहे. रस्ते कामे सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अधिक गतीने कामे करताना गुणवत्तापूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. दिवसापेक्षा रात्रीचे तापमान कमी असल्याने काँक्रिटीकरण कामे रात्री केली जात आहेत. त्यामुळे दुय्यम अभियंता, सहायक अभियंत्यांनी रात्रीच्या वेळी प्रकल्पस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असेही बांगर यांनी नमूद केले. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community