Library : धडपड वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याची

स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय, छत्रपती संभाजीनगर

48
Library : धडपड वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याची
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

‘वाचाल तर वाचाल’ असं आपण सहज म्हणून जातो. मात्र ही बाब किती लोक गांभिर्याने घेतात? आता तर वेब सिरीज व रील्सच्या युगात आपण जगत आहोत. त्यामुळे अनेक लोक वाचनापासून दूर जात आहेत. यास पर्याय म्हणून ऑडिओ बुक्स निर्माण होत आहेत. पाश्चिमात्य देशात पुस्तके लिहून श्रीमंती झालेली अनेक उदाहरणे आहेत. मात्र आपल्या मराठी साहित्याला समृद्ध इतिहास व वारसा असूनही वाचनाच्या बाबतीत आपण खूपच मागासलेले आहोत. त्यात इंग्रजी माध्यमांचं टूम आल्यामुळे मराठी वाचन संस्कृती खूप मागे पडली. अशा परिस्थितीत सावरकरी विचारांचे शिलेदार वाचन संस्कृती जोपासण्यासाठी धडपड करत आहेत ही अत्यंत सकारात्मक व आनंदाची बाब आहे.

तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय’ ही लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी धडपड करणारी संस्था आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना १५ नोव्हेंबर १९९१ रोजी झाली. या वाचनालयास (Library) (संस्थेस) शासनाची मान्यता मार्च १९९२ रोजी मिळाली. सुरवातीला फक्त २०००/- रुपये शासनाचे अनुदान वर्षाला मिळायचे. मात्र आपण सावरकरांचे वैचारिक वारसदार आहोत, हार मानायची नाही हे मनात ठरवून मित्रमंडळाने काही पैसे जमा केले व वर्गणीच्या माध्यमातून सुरवातीला ५१ ग्रंथ खरेदी केले आणि अशाप्रकारे झाली स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाची सुरूवात. या वाचनालयाचे वैशिष्ट्य असे की त्या काळचे प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र लोकांना वाचनालयाकडे वळवायला बरीच मेहनत करावी लागली. कारण त्यावेळी ग्रामीण भागात सार्वजनिक वाचनालय (Library) ही संकल्पनाच नवीन होती. एखादी नवीन गोष्ट साकारताना अनेक सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते.

(हेही वाचा – भाजपा नेत्याचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, मेंदूचे…)

दैनिके, काही मासिके/साप्ताहिके यांची वर्गणी भरुन अनेक अंक मागविण्यात आले. त्यावेळी मार्मिक हे साप्ताहिक खूप प्रसिद्ध होते. त्यामुळे वाचनालयात (Library) मार्मिक ठेवायलाच लागत असे. लोकांना जल्लोष आवडतो, त्यामुळे वाचनालयाच्या प्रकल्पात आर्थिक पाठबळ मिळणे खूपच कठीण होते. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. म्हणूनच आर्थिक कमतरतेवर मात करण्यासाठी समाजोपयोगी कामे हाती घेऊन वर्गणी जमा करण्याचे काम या संस्थेतर्फे केले जाते. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींचीही वेळोवेळी साथ लाभते. या संस्थेचे अध्यक्ष मनोज मुळे यांनी स्वतःची १ हजार स्केअर फूटाची जागा संस्थेला दान म्हणून दिली. ती जागा संस्थेच्या नावावर झाल्यावर ‘राजाराम मोहनरॉय ग्रंथालय फाऊंडेशन, कोलकोता’ या केंद्र सरकारच्या संस्थेकडे इमारत उभी करण्यासाठी अनुदानाची मागणी केली. सतत पाठपुरावा करुन १० लक्ष रुपये अनुदान स्वरुपात मिळवण्यास संस्थेला यश आले, तसेच लोकांकडून ६ लक्ष जमा झाली. अशाप्रकारे १६ लक्ष रुपयांत इमारत उभी करण्यात आली.

२०१९ ला या इमारतीचे लोकार्पण झाले. आज त्या इमारतीत वाचनालय सुरू असुन त्याच इमारतीच्या वरच्या भागावर सुसज्य असे सभागृह/अभ्यासिका बांधण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी सीडीआर फंड अथवा इतर निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सफल झाल्यास अत्याधुनिक यंत्रणा असलेले सभागृह उभारले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात (Library) आता १८,८८३ ग्रंथ आहेत, दररोज १५ दैनिके आणि २७ मासिके/पाक्षिके/साप्ताहिके उपलब्ध असतात. या वाचनालयाचे २००+ वाचक सभासद असून जवळपास १००० ग्रंथ हे स्पर्धा परिक्षेच्या संबंधित आहेत. विशेष म्हणजे या ग्रंथांच्या सहाय्याने अनेक विद्यार्थी पोलीस व इतर विभागात परीक्षा देऊन सेवेत रुजू झाले आहेत. काही विद्यार्थी एमपीएससी व विविध मोठ्या परिक्षासांठी या वाचनालयातील ग्रंथांचे सहाय्य घेत असतात. याबाबत संस्थेचे अध्यक्ष मनोज मुळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

(हेही वाचा – 10th 12th Result Date : दहावी-बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला निकाल होणार जाहीर)

संस्थेच्या कार्यकारी मंडळात मनोज मुळे – अध्यक्ष, दिनेश देशपांडे – उपाध्यक्ष, सुर्यकांत उबाळे – सचिव, राजेंद्र तांदळे – कोषाध्यक्ष, अजय जैस्वाल – सदस्य, राधाकिसन उबाळे – सदस्य, बेबीताई उबाळे – सदस्य आदी मान्यवर संस्थेची व समाजाच्या उन्नतीची धुरा सांभाळत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय हे शासन दरबारी ‘तालुका ब दर्जा’चे ग्रंथालय आहे. लवकरच तालुका ‘अ’ मिळण्याची संस्थेची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० सार्वजनिक वाचनालय आहेत. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे चालणाणारे हे एकमेव वाचनालय (Library) आहे. हे या वाचनालयाचे वेगळेपण आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून सावरकरांचे विचार घरोघरी पोहचवण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात. सावरकरांच्या नावाने संस्था चालवणे म्हणजे काटेरी मार्गावरुन चालण्यासारखे आहे. समाजात द्वेष पसरवणारे घटक सज्जनांपेक्षा अधिक सक्रियतेने काम करत आहेत. अशा वातावरणात सावरकरांना अभिप्रेत असलेले कार्य करणे त्यातही वाचन संस्कृती जिवंत ठेवणे हे काम म्हणजे सतीचे वाण आहे. सतीचे हे वाण या संस्थेने घेतले आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.