-
सुजित महामुलकर
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गेल्या रविवारी त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात, विधानसभेला आपण का पराभूत झालो, यांची कारणमिमांसा करत आपली चूक कबूल केली. मात्र, चूक कबूल करूनही सुधारणा शून्य. विधानसभेला दारुण पराभव होऊनही उद्धव ठाकरे यांच्या ‘मनात सत्ता गेल्याची सल’ अद्याप कायम आहे, असे दिसते. ठाकरे यांचे भाषण अजूनही गद्दार, खोके, बाप चोरला, पक्ष चोरला, भाजपाचे हिंदुत्व गोमूत्रधारी याच मुद्द्यांभोवती फिरताना दिसत आहे.
ठाकरेंचे भाषण म्हणजे भाजपा-शिदेंवर टीका
गेल्या रविवारी ०९ मार्च २०२५ या दिवशी ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांचा निर्धार मेळावा मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी सकाळी तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संध्याकाळी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका आणि आपले हिंदुत्व कसे खरे? हे सांगण्याचा अट्टाहास.
(हेही वाचा – Congress ने छत्रपतींच्या बदनामीचे काम केले; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हल्लाबोल)
स्वतःच्याच क्षमतेवर अविश्वास?
खरं तर, या मेळाव्याने टीका करण्याची एक नवी उंची गाठली असल्याचे दिसून आले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातही भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करणारी एक फिल्म बनवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी मोठ्या पडद्यावर दाखवली गेली. याचा अर्थ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतःला असुरक्षित मानतात, अशी समजूत शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांची होऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची चित्रफीत दाखवली तरी एकवेळ समजू शकतो, मात्र एखाद्या कलाकाराकडून किंवा कृत्रिम बुद्धिमता ‘एआय’च्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सहाय्याने बाळासाहेबांच्या आवाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे, म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर १२ वर्षांनीही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांना स्वीकारले नाही, यांचे हे द्योतक आहे. त्याचप्रमाणे उद्धव (Uddhav Thackeray) आणि आदित्य यांचा स्वतःच्याच क्षमतेवर अविश्वास व्यक्त करण्याचा प्रकार म्हणता येईल.
‘पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम’
लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)-शिवसेना उबाठा यांच्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी (अप) यांच्या महायुतीसमोर सपशेल मार खाल्ला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्यांनी हे आपल्याला सांगितल्याची माहितीही दिली. ठाकरे म्हणाले, “आपण केलेलं काम जागावाटपाच्या साठमारीत आपणच मारून टाकलं, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्यांनी मला सांगितलं आणि ते खरं आहे,” असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून चूक झाल्याची कबुलीच दिली. पण त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला कान टोचावे लागले, हे विशेष. हेच कुणा शिवसेना नेत्याने सांगितले तर त्याला पक्षात अलगत ‘साइड-लाइन’ करण्याची पद्धत होती. अशाच चुका एकनाथ शिंदे आणि अन्य काही आमदारांनी लक्षात आणून दिल्या होत्या, टाहो फोडून सांगितल्या होत्या, तरी त्या मान्य केल्या गेल्या नाहीत. अखेर शिंदे यांनी बंड केले आणि ठाकरेंची सत्ता गेली. परिणामी, जून २०२२ पासून शिवसेना उबाठाकडे भाजपा आणि शिंदे यांच्यावर टीका करणे, हा एकमेव ‘पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम’ सुरू झाला आहे.
(हेही वाचा – 10th 12th Result Date : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला निकाल होणार जाहीर)
दिशा कोणती कल्पना नाही
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच, “दिशा कोणती कल्पना नाही, पण पाऊल पुढे टाकण्याची हिंमत तुम्ही दाखवलीत,” अशा शब्दांत उपस्थित पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. वास्तविक पाऊल पुढे टाकण्याआधी त्याची योग्य दिशा निश्चित करणे महत्त्वाचे असते अन्यथा चुकीचा मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या विरुद्ध दिशेला घेऊन जाऊ शकतो.
‘बघतात बूम, बोलून झालं की ठोकतात धूम’
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राजकीय पक्षाचे प्रमुख असले तरी विधान परिषदेतील एक आमदारही आहेत. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी ३-४ दिवसच परिषद सभागृहात हजेरी लावली असेल आणि अर्थसंकल्प सादरीकरणाचा वेळ वगळता, साधारण २-३ तासच सभागृहात उपस्थिती राहिली असेल, असा परिषदेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांचा अनुभव आहे. विधीमंडळात यावरून एकनाथ शिंदे यांनी एकदा ‘बोलण्यासाठी बघतात बूम (न्यूज चॅनलचा माइक), आणि बोलून झालं की ठोकतात धूम’, अशा शब्दांत त्यांना टोलाही हाणला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community