राज्यातील बसस्थानकं प्रवाशांसाठी अधिक सोयीची व अत्याधुनिक बनवण्यासाठी “बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी)” या तत्त्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि अंबोली तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा या बसस्थानकांच्या विकासासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
( हेही वाचा : Nagpur Violence पूर्वनियोजित कट; मास्टरमाईंड शोधून कठोर कारवाई करा : भाजपा गटनेते प्रविण दरेकर)
राज्य विधानभवन येथे राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) , आमदार चंद्रकांत सोनावणे (Chandrakant Sonawane ) , एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन ( Dinesh Mahajan) , मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख (Girish Deshmukh) यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या अंबोली बसस्थानकाचा विकास
परिवहन मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, “शहर, तालुका व ग्रामीण भागातील परिवहन व्यवस्था बळकट करण्यासाठी बीओटी तत्त्वावर सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि अंबोली बसस्थानकं विकसित करण्यात येतील.” यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अंबोली (Amboli) येथील बसस्थानक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून तेथे सर्व सुविधा असलेले नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी केली.
सिल्लोड बसस्थानक परिसरात अपघात रोखण्यासाठी रस्त्याची मागणी
माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधले. “या परिसरात रस्त्याची अत्यंत गरज असून स्थानिकांची ही मागणी मान्य करावी,” अशी सूचना त्यांनी केली. यावर मंत्री सरनाईक यांनी तातडीने निर्णय घेऊन बसस्थानक परिसरात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
चोपडा बसस्थानक होणार अत्याधुनिक बसपोर्ट
यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट स्वरूपात विकसित करण्याची मागणी केली. “चोपडा हा मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील आदिवासीबहुल तालुका असून, येथील बसस्थानक प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते सर्व सुविधा युक्त आणि अत्याधुनिक करणे आवश्यक आहे,” असे सोनावणे यांनी सांगितले. मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही मागणी मान्य करत “लवकरच निविदा प्रक्रिया राबवून बीओटी तत्त्वावर चोपडा बसस्थानकाचा विकास करण्यात येईल,” असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रवाशांसाठी सुसज्ज बसस्थानकांचा मार्ग मोकळा
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, बसस्थानकं ही आधुनिक सुविधांनी युक्त असतील. यामुळे राज्यातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवास सुखकर होणार आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community