सुजित महामुलकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षात मुंबई अध्यक्ष हे पद निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर मनसेचा पहिला मुंबई अध्यक्ष कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असून संदीप देशपांडे यांचीच मुंबई अध्यक्ष म्हणून निवड होईल तर ठाण्याची जबाबदारी अविनाश जाधव यांच्याकडे सोपवली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
( हेही वाचा : गांधी, पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांनाही British द्यायचे निर्वाह भत्ता )
मुंबई पदाधिकाऱ्यांची बैठक
मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांनी मंगळवारी १८ मार्च २०२५ या दिवशी आयोजित केली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी मुंबई-ठाणे-पुण्यासाह काही शहराच्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार मुंबई अध्यक्ष पद, ठाणे, पुणे, नाशिक, यासह शहर-जिल्हा प्रमुखांची पदे निर्माण करण्याचे ठरवले आहे, असे सांगण्यात आले.
महापालिका निवडणूक तयारी
मुंबईसह जवळपास २९ महत्वाच्या महापालिकांची मुदत संपून २-३ वर्षे झाली. महापालिका प्रभाग पुनर्रचना आणि ओबीसी आरक्षण, या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी मे २०२५ मध्ये आहे. त्यामुळे पालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसेच त्यानंतर मान्सून सुरू होईल आणि पुन्हा ऑक्टोबरपर्यंत महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी दाट शक्यता आहे.
पालिका निवडणुकीला पुढील ७-८ महिन्याचा वेळ असल्याने तोपर्यंत पक्षाला काहीतरी कार्यक्रम देऊन गुंतवून ठेवण्याचे धोरण सगळेच पक्ष राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनसेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाकी मार्गदर्शन गुढी पाडव्याला
मनसेचा पुढील महत्वाचा दिवस म्हणजे मराठी नववर्ष ‘गुढी पाडवा’. या महिन्याच्या अखेर ३० मार्चला गुढी पाडवा सण असून त्या दिवशी संध्याकाळी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात येतो आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community