
-
प्रतिनिधी
अकोला शहरात केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील विविध भागात भुयारी मलवाहिन्यांचे जाळे टाकले जाणार असून, त्यासाठी मंजुरी मिळालेल्या आणि स्थगित असलेल्या 96 रस्त्यांवर प्रथम काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बुधवारी विधानसभेत दिली. अकोला शहरातील या महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात सदस्य साजिद पठाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य अर्जुन खोतकर यांनीही सहभाग घेतला.
यावर उत्तर देताना मंत्री सामंत (Uday Samant) म्हणाले की, मलनिःस्सारण प्रकल्पामुळे रस्त्यांमध्ये खोदकाम होणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी तब्बल ८३ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. रस्त्यांची दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीच्या कामांसाठी महानगरपालिकेला स्पष्ट निर्देश दिले जातील.
(हेही वाचा – ‘इंडिया’ हा शब्द बदलून भारत किंवा हिंदुस्तान करण्याबाबत लवकर निर्णय घ्या, Delhi High Court चे केंद्राला निर्देश)
तसेच, ज्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मंत्री सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले. मलनिःस्सारण प्रकल्पाबरोबरच शहरातील इतर मंजूर रस्त्यांची कामेही हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जालना महानगरपालिकेच्या अमृत 2.0 योजनेतील समावेशासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधित महापालिकेला देण्यात येतील, असे आश्वासनही मंत्री सामंत यांनी सभागृहात दिले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अकोला शहरातील मलनिःस्सारण व्यवस्थेत सुधारणा होणार असून, रस्त्यांची दुरवस्था टळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community