
-
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेली पोटनिवडणूक बिनविरोध पार पडली असून राज्याला नवीन पाच आमदार मिळाले आहेत. भाजपाकडून दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे.
मात्र, या निवडणुकीदरम्यान तिन्ही पक्षांतून ज्यांची नावे चर्चेत होती, पण संधी न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही यादी मोठी असली तरी, या इच्छुकांनी आता नाराजी झटकून पुन्हा तयारीला सुरुवात केली आहे. कारण, विधान परिषदेच्या आणखी तब्बल २१ जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या जागांवर डोळा ठेवून इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने लॉबिंग आणि फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. (Legislative Council Election)
(हेही वाचा – Jammu and Kashmir: घुसखोरी प्रकरणी एनआयएची छापेमारी; राज्यातील 10 ठिकाणी एकाच वेळी केली कारवाई)
महाराष्ट्र विधान परिषद ही ७८ सदस्यीय असून यातील ३० सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात, २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, ७ पदवीधर मतदारसंघातून, ७ शिक्षक मतदारसंघातून आणि १२ सदस्य राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात. काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त १२ पैकी ६ सदस्यांची नियुक्ती झाली असून उर्वरित ६ जागा अजून रिक्त आहेत.
याशिवाय, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्यामुळे २२ पैकी तब्बल १५ सदस्य निवृत्त झाले असून त्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्या राज्यपाल नियुक्त ६ आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १५ अशा एकूण २१ जागा रिक्त आहेत. (Legislative Council Election)
(हेही वाचा – ‘इंडिया’ हा शब्द बदलून भारत किंवा हिंदुस्तान करण्याबाबत लवकर निर्णय घ्या, Delhi High Court चे केंद्राला निर्देश)
पुढील वर्षी आणखी १४ जागा रिक्त होणार
याशिवाय पुढील वर्ष अखेरीस आणखी १४ जागा रिक्त होणार आहेत. यामध्ये संभाजीनगर मतदारसंघाचे आमदार अंबादास दानवे यांची २९ ऑगस्ट रोजी, तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या ९, शिक्षक मतदारसंघातील २ आणि पदवीधर मतदारसंघातील ३ अशा एकूण १४ आमदारांची मुदत संपत आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची लॉबिंग सुरू होणार असून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.(Legislative Council Election)
(हेही वाचा – पुणे शहरात कौशल्य विकास केंद्र उभारणार; मंत्री Uday Samant यांची घोषणा)
अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
दरम्यान, विधान परिषद पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यांनी एकाच कालावधीत रिक्त झालेल्या जागांसाठी एकत्रित निवडणूक का घेतली जात नाही? याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच या प्रक्रियेत कोणताही पक्षपातीपणा अथवा अपारदर्शकता होऊ नये यासाठी निवडणूक आयोग कोणते उपाय करतो, याची माहिती देण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर, पुढील काही महिन्यांत विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात मोठा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता असून, इच्छुकांसह सर्वच पक्षांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. (Legislative Council Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community