तर पुन्हा लागणार राज्यात लॉकडाऊन! काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्यातील कोविड रुग्णांना दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागली की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल.

117

येत्या 15 ऑगस्टपासून राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी देखील राज्यात कधीही पुन्हा लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिले आहेत.  दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे, तर देशासमोर कसे आव्हान उभे ठाकले आहे त्याचे ताजे उदाहरण आहे. म्हणूनच यावेळी आम्ही राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे. यापुढे राज्यातील कोविड रुग्णांना दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागली की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

सावध रहायला हवे

कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पहायचे आहे. आपण निर्बंध शिथिल केले असले, तरी विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलेच पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचाः मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आणली जाणार?)

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून, दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती. त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की, राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल. 

काळजी घेऊन निर्णय घेऊ

गेल्या पावणे दोन वर्षांत कोविडने खूप काही शिकवले आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढत आहोत. निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. आपण मर्यादित प्रमाणात का होईना, पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल, उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत. इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचाः थकीत पाण्याच्या बिलांवरील अतिरिक्त आकारावर तिसरी लाट संपुष्टात येईपर्यंत सूट!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.