-
ऋजुता लुकतुके
टी-२० क्रिकेटमध्ये स्ट्रॅटेजिक टाईम – आऊट आणि इम्पॅक्ट खेळाडूसारखे अभिनव प्रयोग आणण्याचं श्रेय आयपीएलला जातं. आता नवीन हंगामातही आयपीएल असाच एक प्रयोग करून पाहणार आहे. अठराव्या हंगामात दुसऱ्या नवीन चेंडूचा नियम बदलण्यात आला आहे आणि हा बदल दूरगामी परिणाम करणारा असू शकतो. आधी नियम समजून घेऊया. रात्रीच्या वेळी मैदानावर पडणाऱ्या दवाचा परिणाम कमी करण्यासाठी नवीन चेंडूचा नियम बदलण्यात आला आहे. दवामुळे चेंडू ओला होतो आणि गोलंदाजांना चेंडूवरील पकड नीट बसवता येत नाही. परिणामी, गोलंदाजी तितकी प्रभावी ठरत नाही. चेंडू अनेकदा हातातून निसटतो. त्यासाठी हा नियम बदलण्यात आला आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – RSS headquarters : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवादी रईस शेखचा जामीन अर्ज फेटाळला)
खासकरून दुसऱ्या डावांत दवाचं प्रमाण वाढतं. कारण, आयपीएलचे सामने दिवस-रात्र खेळवले जातात. त्यामुळे इथून पुढे दुसऱ्या डावांतील अकराव्या षटकांत मैदानावरील पंच चेंडूचं परीक्षण करतील आणि दवामुळे चेंडू आणि त्याची शिवण पूर्णपणे ओली झाली असेल तर हा चेंडू बदलून नवीन चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाला देण्याचा अधिकार पंचांना असेल. जर सामने दुपारी चार ते संध्याकाळी ७ दरम्यान होणार असतील तर अशा सामन्यात नवीन चेंडू मिळणार नाही. रात्री पडणाऱ्या दवामुळे गोलंदाजांचा प्रभाव कमी होऊन सामने फलंदाजांना धार्जिणे होतात. अशावेळी गोलंदाजांनाही सामन्यात वर्चस्व गाजवण्याची समसमान संधी मिळावी, यासाठी नियमांत हा बदल करण्यात आला आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या नवीन हंगामात बदललेले आणि कायम राहिलेले सर्व नियम एका दृष्टीक्षेपात)
गोलंदाजांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता त्यांना चेंडूची लकाकी कायम ठेवण्यासाठी लाळ किंवा थुंकी वापरता येणार आहे. कोव्हिड १९ च्या काळात सुरक्षेच्या कारणावरून यावर बंदी घालण्यात आली होती. पुढे २०२२ मध्ये आयसीसीने ही बंदी कायमस्वरुपी केली. पण, गोलंदाजांचा याला विरोध होता. चेंडू वापरल्यावर त्याच्यावर धूळ बसून चेंडूची लकाकी कमी होते आणि तो चांगला स्विंग होत नाही. याचा त्रास खासकरून तेज गोलंदाजांना होतो. त्यामुळे चेंडूला थुंकी किंवा लाळ लावता यावी अशी त्यांची बरेच दिवसांची मागणी होती. सध्या निदान आयपीएलने गोलंदाजांच्या मागणीची दखल घेतली आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community