IPL 2025 : आयपीएलच्या हंगामासाठी पंचांचं पॅनल जाहीर; मैदानात ७ नवीन चेहरे

IPL 2025 : हंगामासाठीच्या पंचांच्या पॅनलमध्ये ३ आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

59
IPL 2025 : आयपीएलच्या हंगामासाठी पंचांचं पॅनल जाहीर; मैदानात ७ नवीन चेहरे
IPL 2025 : आयपीएलच्या हंगामासाठी पंचांचं पॅनल जाहीर; मैदानात ७ नवीन चेहरे
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने आयपीएलच्या ताज्या हंगामासाठी मैदानावरील पंचांचं पॅनल जाहीर केलं आहे आणि यात सात नवीन पंचांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यातील पंचगिरीचा अनुभव मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. स्वरुपानंद कोण्णूर, अभिजीत भट्टाचार्य, पराशर जोशी, अनिष सहस्त्रबुद्धे, केयुर केळकर, कौशिक गांधी आणि अभिजीत बेनगिरी अशी या अननुभवी पंचांची नावं आहेत. एस. रवी आणि सी. के. नंदन या अनुभवी पंचांना नवीन पंचांचे मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आलं आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – RSS headquarters : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवादी रईस शेखचा जामीन अर्ज फेटाळला)

‘कौशिक गांधी हा तामिळनाडूचा माजी क्रिकेटपटू आहे आणि तो ३४ प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. पण पंच म्हणून त्याचं हे दुसरंच वर्ष आहे. पहिल्या वर्षातील त्याची कामगिरी पाहून त्याला डब्ल्यूपीएल आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आधीच संधी देण्यात आली आहे. आता आयपीएलमध्ये संधी दिल्यानंतर तो आंतरारष्ट्रीय स्तरावरही येत्या काळात चमकू शकेल,’ असं बीसीसीआयच्या सूत्रांनी याविषयी सांगितलं. (IPL 2025)

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या नवीन हंगामात बदललेले आणि कायम राहिलेले सर्व नियम एका दृष्टीक्षेपात)

यंदा आयपीएलमध्ये मायकेल गॉ, ख्रिस गॉफनी आणि ॲड्रियन होल्डस्टॉक हे तिघे आंतरराष्ट्रीय पंचही पंचगिरी करणार आहेत. तर पंचांच्या यादीतून कुमार धर्मसेना आणि अनिल चौधरी ही दोन महत्त्वाची नावं वगळण्यात आली आहेत. धर्मसेना हा श्रीलंकेचा माजी खेळाडू आहे आणि पंच म्हणूनही त्याची कारकीर्द गाजली आहे. पण, यंदा तो टीव्हीवर समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तो मैदानात पंच म्हणून दिसणार नाही. आयपीएलचा अठरावा हंगाम २२ मार्चला कोलकात्यातील ईडन गार्डन्सवरील सामन्याने सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमने सामने असतील. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.