उत्तराखंडमधील (Uttarakhand) बेकायदेशीर मदरशांबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी घेतलेली भूमिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दि. २० मार्च रोजी उधम सिंह नगरमध्ये (Udham Singh Nagar) १६ आणि हरिद्वारमध्ये (Haridwar) २ मदरसे सील करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात ११० मदरशांना टाळे ठोकण्यात आले आहे. गेल्या एका महिन्यापासून प्रशासन सरकारच्या परवानगीशिवाय चालणाऱ्या बेकायदेशीर मदरशांवर कारवाई करत आहे.
( हेही वाचा : “संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल” ; CM Devendra Fadnavis यांची टीका)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उधम सिंह नगरच्या (Udham Singh Nagar) रुद्रपूरमध्ये ४, किच्छामध्ये ८, बाजपूरमध्ये ३, जसपूरमध्ये १ आणि हरिद्वारच्या (Haridwar) श्यामपूर भागात २ मदरसे सील करण्यात आले. यापूर्वी देहरादून आणि पौडी येथील ९२ मदरशांवर अशीच कारवाई करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्याच्या मूलभूत स्वरूपाशी छेडछाड सहन केली जाणार नाही. त्यांच्या विधानामुळे लोकांमध्ये अशी आशा निर्माण झाली आहे की चुकीचे काम करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. धामी म्हणाले, “धर्माच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
हरिद्वारमधील गंडीखाटाच्या गुज्जर वसाहतीत नोंदणीशिवाय दोन मदरसे सुरू होते, जे दि. २० मार्च रोजी सील करण्यात आले. हरिद्वारचे एसडीएम अजयवीर सिंह (Ajayveer Singh) म्हणाले, “आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश मिळाले आहेत. मदरसा बोर्डाकडे (Madrasa Board) किंवा शिक्षण विभागाकडे नोंदणीकृत नाहीत अशा मदरशांवर कारवाई करण्याचे आणि त्यांना सील करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले आहेत. हे आदेश आजच आले आहेत, त्यामुळे आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्यांना सील करण्याची कारवाई करू, असेही सिंह म्हणाले.”
दरम्यान बेकायदेशीर मदरसे चालवणाऱ्यांचा शोध घेत आहे. तिथे मुलांना काय शिकवले जात होते याचाही तपास सुरु आहे. हरिद्वारचे डीएम कर्मेंद्र सिंह म्हणाले की, जिल्ह्यात ६० हून अधिक बेकायदेशीर मदरसांची (Illegal madrasas) ओळख पटलेली आहे. माहितीनुसार, गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांनी नोंदणीशिवाय कार्यरत असलेल्या २०० हून अधिक मदरशांची ओळख पटवली, त्यापैकी उधम सिंह नगर जिल्ह्यात सर्वाधिक १२९ मदरसे होते, त्यानंतर डेहराडूनमध्ये ५७ आणि नैनितालमध्ये २६ मदरसे होते.
Join Our WhatsApp Community