
-
मुंबई, विशेष प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांचे रूपच पालटून टाकले आहे. महामार्गांसोबतच सेवा रस्ते आणि बस थांबे स्वच्छ झाले आहेत. १७ ते २२ मार्च २०२५ दरम्यान दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत राबविलेल्या या मोहिमेत एकूण ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यात एकूण १५८.५ टन राडारोडा, ३५.४ टन कचरा आणि २४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे खरोखरच द्रुतगती महामार्गाची साफसफाई होत होती का असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांच्या देखरेखीखाली पूर्व आणि पश्चिम महामार्गांवर ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
(हेही वाचा – Sanatan Prabhat : ‘सनातन प्रभात’ नेहमीच काळाच्या पुढे राहिले आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर)
या मोहिमेत दोन्ही महामार्गांलगतचे सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदींची स्वच्छता, महामार्गावरील दिशादर्शक फलक, झाडांच्या बुंध्यांची व कुंपणांची स्वच्छता व रंगरंगोटी, बस थांब्यांची स्वच्छता, आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, रस्त्यावर अडथळा ठरणारी निकामी/बेवारस वाहने तसेच अनधिकृत जाहिरात फलकांचे निष्कासन, पदपथांचे पेव्हर ब्लॉक व दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी आदी बाबींचा समावेश होता.
मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण १६ यांत्रिक स्वच्छता संयंत्रांच्या सहाय्याने या मोहिमेत दोन्ही महामार्गांवर व्यापक स्वच्छता करण्यात आली. मोहिमेची सुरुवात दिनांक १७ मार्च २०२५ रोजी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (Sion) येथून तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे (Bandra) येथून झाली. त्यानंतर सलग सहा दिवसांच्या कालावधीत दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत पूर्व महामार्गावर शीव ते घाटकोपर, घाटकोपर ते विक्रोळी, विक्रोळी ते मुलुंड चेक नाकादरम्यान तसेच पश्चिम महामार्गावर वांद्रे ते अंधेरी, अंधेरी ते कांदिवली ९० फूट मार्ग, कांदिवली ९० फूट मार्ग ते दहिसर चेक नाका यादरम्यान स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत सहा दिवसांच्या कालावधीदरम्यान दोन्ही महामार्ग मिळून एकूण ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये १५८.५ टन राडारोडा, ३५.४ टन कचरा आणि २४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, सदर विशेष स्वच्छता मोहीम पार पडली असली तरी दोन्ही महामार्गांवर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने नियमितपणे स्वच्छता सुरू राहील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community