Uday Samant यांचा कुणाल कामरा प्रकरणावर हल्लाबोल; म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग…

65
काँग्रेसच्या तालावर ठाकरेंचा नाच मंत्री Uday Samant यांची टीका 
  • प्रतिनिधी

शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामराच्या या कृतीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग ठरवत सामंत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखण्याची मागणी केली. तसेच, या प्रकरणामागे ‘प्लांट’ असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी कठोर कारवाईची गरज असल्याचे मत मांडले.

“अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा, शिंदेंवरील टीका खपवणार नाही”

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरून गाणे बनवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही. आमच्या नेत्यावर कोणी बोलत असेल, तर आमच्या शिवसैनिकांचे शिंदे साहेबांवर जे प्रेम आहे, ते व्यक्त होणारच. कामरा कोणासोबत बसला आहे, काय सुरू आहे हे पाहिले पाहिजे. असे वक्तव्य करायला नको होते. जे मागे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, “मी मंत्री होण्यापूर्वी एक शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे की अन्यायावर पेटून उठले पाहिजे. शिंदे साहेबांवर टीका झाल्याने शिवसैनिक दुखावणारच.”

सामंत (Uday Samant) यांनी गुलाबराव पाटील यांच्या आक्रमक वक्तव्याचे समर्थन करत म्हटले, “कलाकाराचा आम्हाला अभिमान आहे, पण आमच्या नेत्यावर टीका होत असेल तर गुलाबराव पाटील यांनी जे बोलले, त्यासोबत आम्ही आहोत.” त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीतील स्टुडिओवर केलेल्या तोडफोडीचे अप्रत्यक्ष समर्थन केले, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारीही अधोरेखित केली. “बोलवता धनी एकच असू शकत नाही, अनेक असू शकतात. पण यातून कायदा-सुव्यवस्था बिघडली तर पुन्हा टाहो फोडायचा का?” असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Gulabrao Patil यांचा कुणाल कामरा आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल)

“१०० टक्के प्लांट, संविधान आम्हीही मानतो”

कामराच्या गाण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करत सामंत (Uday Samant) म्हणाले, “शिंदे साहेबांवर टीका केल्यावर ठाकरे आणि राऊत समर्थनच करणार. हे १०० टक्के प्लांट आहे. कामरा जर संविधानाची प्रत दाखवत असेल, तर आम्हीही संविधान मानणारे आहोत.” कामराने आपल्या गाण्यानंतर संविधानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, यावरही सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

वाघ्या आणि संभाजीराजेंच्या मागणीवर मत

वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिकतेच्या वादावर बोलताना सामंत (Uday Samant) म्हणाले, “यात स्वतः मंत्री भरत गोगावले दुखावले आहेत, त्यांनी मत व्यक्त केले आहे. इतिहास न वाचता बोलणे उचित नाही. वाचून समजून बोलले पाहिजे. संभाजीराजे यांनी लिहिलेले पत्र वाचले पाहिजे.” त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चेची गरज असल्याचे मत मांडले.

(हेही वाचा – कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करत आहोत, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार ; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा इशारा)

“प्रशांत कोरटकरवर कारवाई सुरू”

छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वादात सापडलेल्या प्रशांत कोरटकर प्रकरणावर सामंत म्हणाले, “आमच्या शिवसैनिकांच्या आणि मंत्र्यांच्या वक्तव्यांकडे बघा. आम्ही म्हटले आहे की थोर महापुरुषांवर टीका खपवून घेतली जाणार नाही. कोरटकरवर कारवाई सुरू आहे, त्याने कोर्टात धाव घेतली आहे.” त्यांनी सरकार या प्रकरणात गंभीर असल्याचे स्पष्ट केले.

“राज ठाकरेंचे वक्तव्य ऐकूनच उत्तर देईन”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांबाबत सामंत (Uday Samant) यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “राज साहेब यांनी मेळाव्यात वक्तव्य केले आहे का, कसे आणि कोणासाठी हे माहीत नाही. त्यांचा सूर काय आहे हे मी ऐकले नाही, ऐकूनच उत्तर देईन,” असे ते म्हणाले.

कुणाल कामराच्या गाण्यामुळे शिवसेना आणि शिवसेना उबाठात पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. शिवसेनेने हे गाणे अपमानजनक ठरवत कारवाईची मागणी केली असून, शिवसेना उबाठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कामराला पाठिंबा दिला आहे. उदय सामंत (Uday Samant) यांच्या या वक्तव्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी स्टुडिओ तोडफोडीप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, कामराविरोधातील तक्रारीवरही कारवाई सुरू आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.