-
ऋजुता लुकतुके
बीसीसीआयशी मध्यवर्ती करार केलेल्या १५ महिला क्रिकेटपटूंची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. पण, पुरुष खेळाडूंची यादी मात्र अजून समोर आलेली नाही. अशी एक चर्चाही सुरू आहे की, निवड समिती, बीसीसीआय (BCCI) आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यामध्ये करारबद्ध खेळाडूंच्या नावावर एकवाक्यता नाहीए, म्हणून ही यादी तयार व्हायला वेळ लागतोय. कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० अशा तीनही प्रकारातील उपलब्धतेवरून खेळाडूंची श्रेणी ठरत असते. पण, जून २०२४ पासून रोहित, विराट आणि रवींद्र जाडेजा टी-२० मधून निवृत्त झाले आहेत. तेव्हा या तिघांच्या श्रेणीवर अजून एकमत झालं नसल्याचीही चर्चा आहे.
त्याचवेळी मधल्या फळीतील मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) करारांत वापसी जवळ जवळ निश्चित आहे. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर श्रेयस या यादीत परतेल. बीसीसीआयच्या (BCCI) मध्यवर्ती करारांच्या यादीत खेळाडूंच्या ए प्लस, ए आणि बी अशा तीन श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत. ज्येष्ठता आणि कौशल्यानुसार या श्रेणी ठरवलेल्या आहेत. यातील ए प्लस श्रेणीच्या खेळाडूंना करारापोटी पार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. तर ए श्रेणीच्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. बी श्रेणीतील क्रिकेटपटूंनी प्रत्येकी वार्षिक ३ कोटी रुपये बीसीसीआयकडून (BCCI) मिळतात.
(हेही वाचा – top 10 marathi ringtones : ही आहेत टॉप १० मराठी रिंगटोन्स! तुमच्याही फोनमध्ये ‘ही’ गाणी वाजतात का?)
राष्ट्रीय निवड समिती मुख्य प्रशिक्षक आणि बीसीसीआयचे (BCCI) सचिव यांच्याशी चर्चा करून खेळाडूंची श्रेणी ठरवत असते. मागच्या वर्षी एकूण ३० पुरुष खेळाडू या यादीत होते. यंदा रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे त्याची जागा रिक्त आहे. ए प्लस श्रेणीत विराट, रोहित, जाडेजा आणि बुमराह यांची नावं सध्या आहेत. पण, यातील फक्त बुमराह तीनही प्रकार खेळतो. पण, इतर तिघांना सध्या कुणी हात लावेल अशी शक्यता कमीच आहे.
तर ए श्रेणीत अय्यर (Shreyas Iyer) वापसी करू शकतो. अक्षर पटेलवर (Axar Patel) अलीकडेच टी-२० प्रकारात उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याला ब श्रेणीतून ए श्रेणीत बढती मिळू शकते. यशस्वी जयस्वाललाही (Yashasvi Jaiswal) यंदा ए श्रेणीत बढती मिळू शकते. करारांच्या यादीत पोहोचण्यासटी खेळाडूला एका वर्षांत ३ कसोटी, ८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळावे लागतात. या निकषांवर सर्फराझ खान, नितिश कुमार आणि आकाशदीप यांची यंदा वर्णी लागणं अनिवार्य आहे. तर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) भारतीय संघाकडून खेळलेले नसल्यामुळे त्यांची मध्यवर्ती करारातून गच्छंती अटळ आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community