-
प्रतिनिधी
मुंबईतील दादर परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिराचे (Shivaji Natya Mandir) नाव आता ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या नाट्यगृहाच्या नावामुळे एकेरी उल्लेख होत असल्याच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार रवींद्र जाधव कोतापकर यांनी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, शिवजयंतीच्या मुहूर्तावर नाट्यगृहाच्या नावात हा सन्मानजनक बदल करण्यात आला आहे.
नाट्यगृहाची पार्श्वभूमी
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट मुंबई या संस्थेची स्थापना ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाली होती. या ट्रस्टद्वारे दादर पश्चिम येथे शिवाजी नाट्य मंदिराची (Shivaji Natya Mandir) उभारणी करण्यात आली. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाट्यगृहाने अनेक नाट्य कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी राजकीय, सामाजिक, कला आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक नामवंत आणि विचारवंतांनी भेटी दिल्या आहेत. मात्र, या नाट्यगृहाच्या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याची बाब अनेक वर्षे कोणाच्याही लक्षात आली नव्हती.
(हेही वाचा – Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर)
रवींद्र जाधव यांचा पाठपुरावा
नाट्यगृहाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आणि ते पुन्हा सुरू करण्यात आले. परंतु, त्याचे नाव पूर्वीप्रमाणेच ‘शिवाजी नाट्य मंदिर’ (Shivaji Natya Mandir) असेच ठेवण्यात आले होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कोतापूर गावचे सुपुत्र पत्रकार रवींद्र बाबाजी जाधव (रवि कोतापकर) आणि त्यांचे मित्र दीपक घेवदे यांनी याबाबत आवाज उठवला. त्यांनी सर्वप्रथम १४ जानेवारी २०२३ रोजी नाट्य मंदिराच्या ट्रस्टला पत्र लिहून नावात बदल करण्याची मागणी केली. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना याबाबत पत्रे लिहिली. मात्र, या पत्रांची कोणीही दखल घेतली नाही.
धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
शिवरायांच्या अवमानाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने रवींद्र जाधव आणि दीपक घेवदे यांनी २२ जुलै २०२४ रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या सुनावणीदरम्यान ट्रस्टकडून तक्रारदारांना कागदपत्रे आणि माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. परंतु, धर्मादाय आयुक्त निकाल देण्याच्या आधीच ट्रस्टने नाट्यगृहाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहाचे नाव ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर’ असे करण्यात आले. याबाबतचे लेखी पत्र रवींद्र जाधव आणि धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Thane Fraud Case : ठाण्यातील एका व्यावसायिकासोबत मोठी फसवणूक; १० कोटींचे कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत २२ लाख गमावले)
रवींद्र जाधव कोतापकर यांच्या या पाठपुराव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आता बंद झाला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांनी सामाजिक जाणिवेतून उचललेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. “शिवरायांचा सन्मान हा प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले,” अशी प्रतिक्रिया रवींद्र जाधव यांनी व्यक्त केली.
‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर’ या नव्या नावाचे नाट्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. या बदलामुळे नाट्यगृहाच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानही अधोरेखित झाला आहे. रवींद्र जाधव आणि दीपक घेवदे यांच्या या प्रयत्नांमुळे एका ऐतिहासिक चूक सुधारली गेली असून, याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. (Shivaji Natya Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community