-
प्रतिनिधी
राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, “मी विरोधी पक्षात असताना जे बोललो ते योग्य होते, पण आता आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे तसे बोलणे योग्य होणार नाही.”
घटनाक्रम असा की, व्यंगचित्रकार कुणाल कामरा याने शिवसेना फुटीवर व्यंगात्मक कविता आणि गाणे सादर केले. या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हटले गेले. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. मुंबईसह अनेक ठिकाणी कामराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली.
(हेही वाचा – सुप्रसिद्ध Shivaji Natya Mandir चे नामांतर आता ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर’)
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा एक जुना व्हिडिओ समाजमाध्यमावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते असताना एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणतात, “शेंबड्या पोरालाही कळतंय, ५० खोके एकदम ओके.” तसेच शिंदेंना “गद्दार” म्हणत त्यांनी जोरदार हल्ला चढवला होता. या व्हिडिओचा आधार घेत कुणाल कामरा याने आपले गाणे तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मी विरोधी पक्षात असताना त्या काळच्या परिस्थितीनुसार ते वक्तव्य केले होते आणि ते योग्य होते. मात्र आता आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो असून सत्तेत एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आता तसे बोलणे योग्य होणार नाही.” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर या वादाला काहीसा विराम मिळाला असला तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि कामराच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरूच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community