-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २ एप्रिलला नवीन आयात शुल्क वाढीची घोषणा करणार आहेत. आपल्या शुल्क वाढीच्या निर्णयात आपण कुठलाही देश अपवाद म्हणून वगळणार नाही, असं सूतोवाच त्यांनी केलं आहे. अमेरिकेबरोबर गेली काही वर्ष व्यापार करणारे देश चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याच्या मताचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला शुल्क वाढीतून सूट मिळेल अशी आशाही काहींना वाटतेय. त्यावरच ट्रम्प यांनी हे रोखठोक भाष्य केलं आहे. (Tariff War)
‘काही मोजके अपवाद असतील. आमची काही देशांची चर्चाही सुरू आहे. पण, खूप जास्त अपवाद नसतील. मला शुल्क वाढीत अपवाद नको आहेत,’ असं ट्रम्प यांनी न्यूजमॅक्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. नवीन शुल्कदर लागू करण्याचा दिवस ट्रम्प यांनी अमेरिकेचा ‘मुक्ती दिन,’ असल्याचं म्हटलं आहे. ‘जे देश अमेरिकन मालाची आयात करताना शुल्क लादून अमेरिकेला लुटतात, त्या देशातील मालावरही त्याच प्रमाणात आयात शुल्क लादणं,’ ही ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यानुसार, २० जानेवारी २०२५ ला सत्ता ग्रहण केल्यानंतर ट्रम्प यांनी सुरुवातीला धातू, धातू उत्पादनं आणि औषध यांच्यावरील आयात शुल्क वाढवलं आहे. (Tariff War)
(हेही वाचा – Shrimant Kokate : इतिहासावरील पुस्तके पुराव्यांशिवाय लिहिली; श्रीमंत कोकाटे यांची जाहीर कबुली)
आता २ एप्रिलला नवीन शुल्क वाढीची घोषणा होणार आहे. यात भारत नेमका कुठे बसतो आणि भारताचा विचार अपवादात्मक देश म्हणून होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारतातून अमेरिकेला टेक सेवा, औषधं, कृषि माल आणि ऑटो क्षेत्रातील सुटे भाग निर्यात होतात आणि या क्षेत्राशी निगडित कंपन्यांना आयात शुल्क वाढीचा फटका आधीच बसला आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेचं एक पथक भारताबरोबर आयात शुल्क वाढीवर चर्चा करण्यासाठी भारतात आलं आहे. या पथकाचे प्रमुख आणि अमेरिकन व्यापार मंत्रालयाचे उपसचिव ब्रेंडन लिंच हे या आठवड्यात वाणिज्यमंत्री पियुष गोयल तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिवांना भेटणार आहे. (Tariff War)
अमेरिकन उद्योजक आणि जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांना त्यांची टेस्ला कंपनी भारतात आणायची आहे आणि टेस्ला कारची विक्री भारतात सुरू करायची आहे. पण, भारतात तयार कार आयात करण्यासाठी १२० टक्के आयात शुल्क द्यावं लागतं. त्याला मस्क यांचा विरोध आहे. एकीकडे भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापारविषयक द्विपक्षीय चर्चा सुरू असताना दुसरीकडे, ट्रम्प यांनी कुठल्याही देशाला शुल्क वाढीतून सूट देणार नसल्याचं म्हटल्यामुळे अमेरिकेची भारताविषयी नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Tariff War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community