-
प्रतिनिधी
शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी हा प्रस्ताव मांडला असून तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी तो स्वीकारला आहे. या हक्कभंग प्रस्तावावर कार्यवाहीचा निर्णय आता विधानसभाध्यक्ष घेणार आहेत.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका करणारे आणि अवमानकारक गाणे सादर केले. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कामरा यांच्या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केली. या घटनेचा पडसाद विधिमंडळातही उमटला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली. कामराच्या अटकेची मागणीही यावेळी करण्यात आली.
(हेही वाचा – Tamim Iqbal : बांगलादेशी खेळाडू तामिम इक्बालला मैदानातच हृदयविकाराचा झटका; तब्येत स्थिर)
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आणि टिंगल केली. त्यामुळेच त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात येत असल्याचे रमेश बोरनारे यांनी सांगितले. “जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक वारंवार अशी वक्तव्य करत असेल, तर त्याची दखल घेणे गरजेचे आहे,” असेही बोरनारे म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात मागील घटनांचा दाखला देत राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी आठवण करून दिली की, “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याबद्दल अर्णब गोस्वामी यांच्यावरही हक्कभंग आणण्यात आला होता. तसेच, तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी केल्यानंतर, त्यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवरही हक्कभंग आणण्यात आले होते.”
(हेही वाचा – Tariff War : अमेरिकेच्या एप्रिल महिन्यातील नवीन आयात शुल्कवाढीत भारताचाही नंबर?)
या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंग समितीबाबत नाराजी व्यक्त केली. “आपण हक्कभंग प्रस्ताव स्वीकारतो, पण शिक्षा होत नाही. हक्कभंग समितीच्या अध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी हक्कभंग समितीचा अध्यक्ष नियुक्त करून तातडीने कामकाज सुरू करावे. अन्यथा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या सभागृहाची किंमत राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे विधानसभेत मोठी चर्चा रंगली असून आता विधानसभाध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Sushma Andhare)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community