-
ऋजुता लुकतुके
माजी भारतीय तेज गोलंदाज आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा भारतीय संघातील खेळाडूंवर ताशेरे ओढले आहेत. ज्येष्ठ खेळाडूंना आणखी संधी दिली पाहिजे असं म्हणतानाच, त्यांनी रोहित शर्माला तंदुरुस्तीसाठी इशारा दिला आहे. ‘मला भारतीय संघाचा प्रशिक्षक केलं तर मी रोहितला रोज २० किमी पळवेन,’ असं त्यांनी म्हटलं आहे. कोहलीच्या ‘फाईन्ड अ वे,’ पॉडकास्टमध्ये बोलताना योगराज यांनी आपली परखड मतं दिली आहेत. पण, आताचा संघ बदलू नये असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. (Yograj on Rohit Sharma)
(हेही वाचा – IPL 2025, LSG BT SRH : लखनौच्या विजयानंतर फ्रँचाईजी मालक गोयंका यांनी पंतला मारली मिठी)
‘आताचा संघ बदलावा असं मला अजिबात वाटत नाही. मी जर संघाचा प्रशिक्षक असतो. तर खेळाडूंना अशा वेळी आत्मविश्वास दिला असता. आताच्या खेळाडूंमध्येच जगज्जेता आणि अपराजित संघ कसा घडेल असं पाहिलं असतं. ही मुलं माझ्या मुलांसारखी आहेत, असाच विचार मी केला असता. फलंदाजांना सूर गवसत नाहीए. त्यांच्याकडून चुका होतायत. पण, त्यांना संधी मिळाली पाहिजे. मी आपली मुलं समजून त्यांच्याकडून मेहनत करून घेतली असती,’ असं योगराज म्हणाले आहेत. (Yograj on Rohit Sharma)
(हेही वाचा – Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार)
रोहित शर्माच्या बाबतीत मात्र योगराज यांनी तंदुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. ‘रोहित शर्माने तंदुरुस्ती वाढवली पाहिजे. मी रोहितला आधी रोज २० किमी धावडवलं असतं. त्यानंतर क्रिकेटचा सराव करता येईल. खेळाडूचा फॉर्म चांगला नसला तरी तो सुधारता येतो. रोहितलाही ती संधी मिळाली पाहिजे. पण, त्यानेही तंदुरुस्तीवर काम केलं पाहिजे,’ असं योगराज यांनी म्हटलं. रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. पहिल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रोहित भोपळाही फोडू शकला नाही. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ प्रशासनाने रोहितला कर्णधारपदावरून हटवलं आहे आणि फ्रँचाईजीचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आहे. (Yograj on Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community