राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपल्याला मिळालेला आमदार निधीतील पहिला विकासनिधी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अर्थात शिवतीर्थावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ४० वर्षे अधिराज्य गाजवले आणि ऐतिहासिक सभांची नोंद केली. त्याच शिवतीर्थावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदार निधीतून सुशोभिकरणाची कामे केली जाणार असून येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्यासह माँसाहेबांचा पुतळा, म्युरळ, बाळासाहेबांचे स्मृती स्थळ तसेच संयुक्त महाराष्ट्र कलादालन उजळून निघणार आहे. मनसेने ज्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर कंदील लावून सेल्फी पॉईंट बनवला होता, त्याच धर्तीवर आता येथील पदपथांवर कायम स्वरुपी कंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे.
पदपथावर कायमस्वरुपी कंदील, दिव्यांची रोषणाई
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदार निधीतील पहिल्या विकासकामांचा शुभारंभ शिवतीर्थापासून केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि शिवसेना यांचे एक वेगळे नाते असून माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ शिवतीर्थावर असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला आमदार निधीतील कामाचा शुभारंभ याच ठिकाणापासून करण्याचा निर्णय घेत त्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे सुशोभिकरण केले जाणार आहे. या सुशोभिकरणाअंतर्गत पार्कमधील संगीतकार सी. रामचंद्र चौक ते संगीतकार वसंत देसाई दरम्यानच्या पदपथावर कायमस्वरुपी कंदील आणि दिव्यांची रोषणाई केली जाणार असल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. त्यामुळे या कामांना लवकरच सुरुवात केले जाईल,असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : आम्ही राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही! उच्च न्यायालयाने मांडल्या मर्यादा)
महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात गॅसचे दिवे!
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा असलेल्या परिसरात गॅसचे दिवे लावले जाणार आहे. शिवाय महाराजांच्या पुतळ्याभोवती स्पॉटलाईटचा झोत सोडून एकप्रकारे ज्योतीचा लूक दिला जाणार आहे. तसेच शिवरायांच्या स्मारक परिसरातील दीपमाळा आणि ऐतिहासिक भित्तीचित्र अर्थात म्युरल्सलाही झळाळी दिली जाणार आहे. याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या परिसराचेही सुशोभिकरण केले जाणार आहे.
संयुक्त महाराष्ट्र कलादालनावर विद्युत रोषणाई
मुंबई महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ज्याप्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाशेजारी असलेल्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या ठिकाणी कायमस्वरुपी दिव्यांनी रोषणाई करत कलादालन उजळून टाकले जाणार आहे. तसेच या कलादालनाच्या भागावर विद्युत रोषणाईच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ऐतिहासिक क्षणांचेही चलतचित्रे दाखवले जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community