नायजेरियनकडून एनसीबी अधिकाऱ्यांवर पुन्हा हल्ला! ५ अधिकारी जखमी 

गुरुवारी रात्री एनसीबीचे पथक मानखुर्द रेल्वे रुळालगत असलेल्या तिवरांच्या जंगलात लपून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन टोळीवर कारवाईसाठी गेले होते.

137

ड्रग्स विक्री असो अथवा सायबर फ्रॉड या दोन्ही गुन्ह्यांत नायजेरियन नागरिकांनी देशात धुमाकूळ माजवला आहे. या टोळ्यांची एवढी हिम्मत वाढली की, भारतात येऊन भारतीय सुरक्षा यंत्रणेवरच हल्ले करीत आहेत. शरीरयष्टीने मजबूत असणाऱ्या या नायजेरियन टोळ्यांच्या हल्ल्यात मागील काही वर्षांमध्ये अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झालेले आहेत. मागील आठवड्यातच परदेशी ड्रग पेडलरकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. आता ड्रग्स विक्री करणाऱ्या या नायजेरियन टोळीने एनसीबीच्या अधिकाऱ्यावर पुन्हा धारदार शस्त्र आणि दगडाने हल्ला केल्याची घटना मानखुर्द येथील रेल्वे रुळालगत असणाऱ्या झुडुपात गुरुवारी रात्री घडली.

लाखो रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त

या हल्ल्यात एनसीबीचे पाच अधिकारी जखमी झाले असून त्यापैकी एक अधिकारी गंभीर जखमी असून या अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्यानंतर देखील एनसीबीच्या पथकाने एका नायजेरियनला अटक करून त्याच्याजवळून लाखो रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. गुरुवारी रात्री एनसीबीचे पथक मानखुर्द रेल्वे रुळालगत असलेल्या तिवरांच्या जंगलात लपून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन टोळीवर कारवाईसाठी गेले होते. दरम्यान एनसीबीच्या अधिकारी यांनी एका नायजेरियनला ताब्यात घेताच त्याने आपल्या साथीदारांना सतर्क करण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. पोलिस आल्याचे समजताच या टोळीचे इतर सदस्य पळून जात असताना एनसीबीच्या अधिकारी यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच ४ ते ५ जणांच्या या टोळीने एनसीबीच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्रे आणि दगडाने हल्ला केला, त्यानंतर काळोखातून पसार झाले.

(हेही वाचा : गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप)

हल्ल्यात एक अधिकारी गंभीर जखमी 

या टोळीच्या हल्ल्यात पाच अधिकारी जखमी झाले असून एका नायजेरियनला अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. जखमी अधिककारी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली. ओबियोराह एकवेलार, एस/ओ एकवेलार असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन ड्रग्स तस्कराचे नाव असून त्याच्याजवळून एनसीबीने २५४ ग्राम हेरॉईन, ५२ ग्राम एमडी आणि ७.५ ग्राम कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील वादीबंदर, मस्जिद बंदर, डॉकयार्ड, तसेच वसई विरार, नालासोपारा, मीरा रोड भायदंर आणि नवी मुंबईतील खार, नेरुळ, कोपरखैरणे आणि ठाण्यातील दिवा परिसरात नायजेरियन नागरिक मोठ्या संख्येने राहण्यास आहे. या नायजेरियनमध्ये दोन पद्धतीच्या टोळ्या आहेत, एक टोळी अशिक्षित असून ती अमली पदार्थाचा तस्करी, विक्री करतात, तर शिक्षित नायजेरियन सायबर गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहेत. हे नायजेरियन टोळ्यांनी राहण्यास असल्यामुळे त्यांची ताकत आणि हिंमत वाढत असून या टोळ्यांच्या वाटेला सामान्य माणूस जात नाही. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी येणाऱ्या पोलिस तसेच इतर सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्यास ही टोळी मागेपुढे बघत नाही. शिक्षणाच्या नावाखाली भारतात येऊन इकडेच स्थायिक होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.