-
प्रतिनिधी
मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMR) क्षेत्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी मंगळवारी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे एमएमआरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. तसेच मुंबई आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
वांद्रे कुर्ला संकुलातील जियो वर्ल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या कार्यक्रमात हे करार करण्यात आले. केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयाच्या महारत्न कंपनी असलेल्या आरइसी लिमिटेड, पावर फायनान्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, नॅशनल बँक फॉर फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट यासारख्या मिनीरत्न, महारत्न आणि नवरत्न कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याने त्याचे अधिक महत्त्व वाढले आहे. तसेच युनिलिव्हर कंपनीच्या मॅग्नम आइस्क्रीम व्यापारासाठीचे ग्लोबल कापॅबिलिटी सेंटर पुणे येथे उभारण्याचा सामंजस्य करारही यावेळी करण्यात आला. या केंद्रामध्ये ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ५०० रोजगार उपलब्ध होणार आहेत.
(हेही वाचा – शकीदुल, दुलाल अख्तर, सद्दाम हुसैन… तृतीयपंथ बनलेल्या Bangladeshi infiltrators ना अटक)
एकट्या एमएमआर (MMR) क्षेत्रामध्ये दीड ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीस मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. तसेच युनिलिव्हर कंपनी सोबत झालेल्या करारामुळे पुण्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. पुणे शहरात मोठ्या संधी आहेत. या करारामुळे या संधीमध्ये वाढ होऊन रोजगार निर्मिती सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे स्थान उंचावणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
तर एमएमआर (MMR) क्षेत्राला २०३० पर्यंत ३०० बिलियन डॉलरच्या जीडीपी पर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी १३५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त करणे आवश्यक आहे. यामुळे आणखी २८ ते ३० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल. राज्याने गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा , कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि मजबूत सरकार यामुळे महाराष्ट्र हे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक व्यवसायांसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला हुडकोचे अध्यक्ष संजय कुलक्षेत्र, आरईसी आणि पीएफसीचे अध्यक्ष परमिंदर चोप्रा, आयआरएफसीचे संचालक शेली वर्मा, एनएबीएफआयडीचे व्यवस्थापकीय संचालक राजकीरण राय, मॅग्नम आइस्क्रीम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित भटाचार्य, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगम आदी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community