राज्यातील शासकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी अध्यापकांच्या (Professor) मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
शासकीय महाविद्यालयांमध्ये सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती व इतर कारणांमुळे पदे सतत रिक्त होत असतात. ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमितपणे भरली जात असली तरी, २०२२ पासून या रिक्त पदांवर कंत्राटी तत्वावर ठोक मानधनावर नियुक्ती करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्या अनुषंगाने आता या कंत्राटी अध्यापकांच्या (Professor) मानधनात वाढ करण्यात आली आहे.
(हेही वाचा तीन वर्षानंतर खाजगी बांधकामासाठी natural sand मिळणार नाही? नैसर्गिक वाळूवर बंदी येण्याची शक्यता?)
नवीन मानधन पुढीलप्रमाणे
- प्राध्यापक: १,५०,००० रुपये
- सहयोगी प्राध्यापक: १,२०,००० रुपये
- सहाय्यक प्राध्यापक: १,००,००० रुपये
या निर्णयामुळे गुणवत्ताधारित अध्यापनासाठी प्रेरणा मिळणार असून, रिक्त पदांवर अधिक कुशल व अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. दरम्यान, राज्यातील खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘आश्वासित प्रगती योजना’ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही योजना आयुष संचालनालय, मुंबईच्या अधिपत्याखालील संबंधित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शासन मंजूर पदावरील पात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. या योजनेतून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळानुसार निश्चित वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, सेवाविषयक स्थैर्य प्राप्त होईल आणि वेतनात येणारी कुंठितता दूर होणार आहे. राज्य शासनाच्या या दोन निर्णयांमुळे आयुष शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामकाज अधिक परिणामकारक होण्यास हातभार लागणार आहे. (Professor)
Join Our WhatsApp Community