दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकलचा प्रवास सुरू झाल्यानंतर भविष्यात ज्यांचा एक डोस झाला आहे, त्यांना देखील लोकल प्रवास मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटू लागल्याने येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असून, वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा देखील सुरू झाली आहे.
म्हणून मिळू शकतो प्रवास!
15 ऑगस्टपासून राज्य सरकारने दोन लसींचे डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी असल्याने लोकलला गर्दी नव्हती. मात्र मंगळवारपासून कार्यालये सुरू झाली असून, तरीही लोकलला गर्दी झाली नाही, तसेच कोरोना रुग्ण वाढले नाहीत, त्यामुळे एक डोस घेतलेल्यांना लोकलचा प्रवास सुरु करण्यास परवानगी देण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.
(हेही वाचा : आमदार गोपीचंद पडळकरांच्या बैलगाडा शर्यती होणार की रद्द होणार?)
आतापर्यंत इतक्या जणांनी काढले पास!
राज्य सरकारने सुचना जाहीर केल्यानंतर लगेच रेल्वे स्थानकांत नागरिकांच्या कोरोना प्रमाणपत्राची आणि ओळखपत्राची पडताळणी करण्याच्या कामाला वेग असून, मध्य रेल्वेवरून 11 ऑगस्टपासून ते 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1 लाख 10 हजार नागरिकांनी मासिक पास काढले. यामध्ये डोंबिवलीवरून सर्वाधिक 9 हजार 631 मासिक पास काढण्यात आले. तर, पश्चिम रेल्वेवर याच कालावधीमध्ये 52 हजार 703 नागरिकांनी पास काढले. यामध्ये 5 हजारांहून अधिक नागरिकांनी बोरीवली येथून सर्वाधिक मासिक पास काढले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 पर्यंत साधारण 1 लाख 62 हजार प्रवाशांना मासिक पास मिळाले.
Join Our WhatsApp Community