डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून एसटीने घेतला मोठा निर्णय

डिझेलसाठीही पैसे नसल्याने बसेस आगारात उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली आहे.

144

कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक संकाटाला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या असलेल्या एसटी बसेसच्या भरवशावर उत्पन्न करण्याचा महामंडळाने प्रयत्न केला. मात्र, अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळाची तिजोरी रिकामी झाल्याचे महामंडळाकडून सांगितले जात आहे. परिणामी आता डिझेलसाठीही पैसे नसल्याने राज्यभरात सुमारे 1100 बसेसच्या फेऱ्या रद्द करुन, बसेस आगारात उभ्या ठेवण्याची वेळ महामंडळावर आली आहे.

प्रवाशांनी फिरवली पाठ

ठाण्यासोबतच इतर विभागांतील आगारात डिझेलच्या कमतरतेमुळे बस गाड्या उभ्या करुन ठेवाव्या लागत आहेत. सध्या एसटीची प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पण तरीही प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता राज्य सरकारने व्यक्त केल्याने, सार्वजनिक प्रवास करण्याचे नागरिकांकडून टाळले जात आहे.

(हेही वाचाः पगाराविना एसटी कर्मचा-यांची ‘घर’गाडी रखडली)

एसटी कामगार संघटनेचा आरोप

कोरोनापूर्वी एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या कोरोना काळात घटली आहे. पण एसटीवर होणारा खर्च मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. डिझेल अभावी फेऱ्या रद्द केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुद्धा बिनपगारी सुट्टी दिली जात असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे राज्य एसटी कामगार संघटनेकडून आरोप करण्यात आला आहे.

(हेही वाचाः एसटीच्या तिजोरीत महापुरामुळे आला ‘दुष्काळात तेरावा’)

डिझेल अभावी गाड्या रद्द करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. आशिया खंडात सर्वात मोठ्या परिवहन संस्थेवर ही वेळ कशामुळे आली, यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. काम करुन वेतन मिळत नाही, अशी अवस्था यापूर्वी कधीच आली नाही. राज्य सरकारने तातडीने पावलं उचलून एसटीचे पालकत्व स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

 

– संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.