मुंबई महापालिकेच्या सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला असतानाच, अंधेरी(पश्चिम) या के-पश्चिम विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. १५ ऑगस्ट रोजी परिमंडळ उपायुक्त भारत मराठे व के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण हे गैरहजर राहत त्यांनी हा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेविका व के-पश्चिम विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा सुधा सिंह यांनी महापौर किशोरी पेडणेकर व महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. झेंडावंदनाच्या या कार्यक्रमालाच प्रभाग समिती अध्यक्षांना डावलल्याची बाब समोर आली आहे.
उपायुक्त व सहाय्यक आयुक्त गैरहजर
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी के-पश्चिम कार्यालयाच्यावतीने झेंडा वंदनाचा कार्यक्रम सकाळी आठ वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सकाळी ७ वाजून ५५ मिनिटाला के-पश्चिमच्या महापालिका कार्यालयात पोहोचले, तेव्हा उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे दोघेही गैरहजर होते, असे प्रभाग समिती अध्यक्ष सुधा सिंह यांनी या निवेदनात म्हटले आहे. जेव्हा आपण तिथे पोहोचलो तेव्हा सुरक्षा रक्षकांनी झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्याचे सांगितले. तसेच काही महापालिका शाळेतील शिक्षक व विद्यार्थी हे कार्यक्रमास नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करुन आले होते, त्यांनाही परत पाठवले, असे म्हटले आहे.
(हेही वाचाः मुंबईतील जंबो कोविड सेंटरमधल्या ऑक्सिजन प्लांटचा खर्च झाला कमी)
कारवाईची मागणी
त्यामुळे सर्वप्रथम उपायुक्त व सहाय्यक आयुक्त हे या कार्यक्रमाला जाणूनबुजून गैरहजर राहणे व अशाप्रकारे सुरक्षा रक्षकांनी झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपता घेणे, हा स्वतंत्रता दिवसासारख्या राष्ट्रीय पर्वाचा अवमान आहेच, शिवाय राष्ट्रध्वजाचाही अवमान केल्याचे सुधा सिंह यांनी म्हटले. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात परिमंडळ उपायुक्त भारत मराठे यांनी झेंडावंदनाचा कार्यक्रम हा विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांच्या अधिपत्याखाली पार पडला जात असल्याचे सांगत, याबाबत आपल्याला कोणतेही निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले.
(हेही वाचाः राणी बागेतील तीन प्याऊ पुन्हा भागवणार पर्यटकांची तहान)
Join Our WhatsApp Community