-
खास प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यात येऊन गेल्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपाच्या मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक नुकतीच झाली. मुंबई महापालिका निवडणूक तयारी सुरू करण्यासाठी पक्षाकडून लवकरच मुंबईसाठी नवा चेहेरा दिला जाणार असून त्यात आमदार अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी आणि माजी आमदार सुनील राणे यांचेही नाव चर्चेत आहे. (Mumbai BJP)
निवडणूक, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये
गेली तीन वर्षे रखडलेली मुंबई महापालिका निवडणूक, नोव्हेंबर-डिसेंबर २०२५, या कालावधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले असताना, भाजपानेदेखील तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीआधी मुंबई भाजपा अध्यक्ष निवडणे क्रमप्राप्त असून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल.
सध्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडेच मुंबई भाजपा अध्यक्ष पदाची सूत्रे असून मुंबईची माहिती असलेल्या नेत्याकडे पुढील अध्यक्ष पदाची धुरा देणे, ही पक्षाची प्राथमिकता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Mumbai BJP)
(हेही वाचा – Girish Mahajan यांच्याकडून एकनाथ खडसे, अनिल थत्ते यांना मानहानीची नोटीस)
सगळ्यात तरुण उमेदवार
४८-वर्षीय अमित साटम हे २०१२ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले तर २०१४ मध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर २०१९ आणि पुढे २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत साटम तिसऱ्यांदा निवडून आले. सध्या मुंबई अध्यक्ष पदासाठी स्पर्धेत असलेल्या उमेदवारांमध्ये साटम सगळ्यात तरुण आहेत.
पदासाठी आघाडीवर
५७-वर्षीय प्रवीण दरेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेपासून सुरू होऊन पुढे मनसे आणि भाजपा असा आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि आमदार दरेकर यांचेही नाव मुंबई भाजपा अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. दरेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, त्यांचा राजकीय प्रवास पाहता पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mumbai BJP)
(हेही वाचा – Hawkers : शीव येथील इंदिरा मार्केटला वाढतोय अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांचा विळखा; भाजपाची तातडीने कारवाईची मागणी)
उपस्थिती वाढली
कांदिवली-पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार अतुल भातखळकर (६०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले असून भाजपाचे कट्टर पाईक, अशी त्यांची ओळख आहे. तर ६२ वर्षीय माजी आमदार सुनील राणे यांचा मुंबईतील बैठकांमध्ये उपस्थिती वाढली आहे. राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांचे निकटवर्तिय समजले जाणारे राणे त्यांच्यावर पक्षातून नवी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थी संघटनेपासून सक्रिय
५८-वर्षीय आमदार (विलेपार्ले पूर्व) पराग अळवणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) माध्यमातून भाजपाची जोडले गेले असून ३० व्या वर्षी १९६७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००७ पर्यंत सलग चार वेळा अळवणी यांनी महापालिकेत काम केले तर त्यानंतर २०१४ पासून तीन वेळा सलग विधानसभेवर निवडून गेले आहेत. महापालिकेचा अनुभव असल्याने अळवणी हेदेखील मुंबई भाजपा अध्यक्ष पदाचे मोठे दावेदार समजले जातात. (Mumbai BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community