-
ऋजुता लुकतुके
सोशल मीडियाचे सम्राट अशी ओळख असलेले अमेरिकन उद्योजक आणि फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्याविरुद्ध अमेरिकेत अविश्वासाचा खटला सुरू झाला आहे. सोमवारी झुकरबर्ग यांनी या बाबतीत आपली बाजूही कोर्टात मांडली आहे. अमेरिकन व्यापार प्राधिकरणाकडे ही सुनावणी सुरू झाली आहे. मार्क झुकरबर्ग आणि पर्यायाने फेसबुकवर असा आरोप आहे की, त्यांनी सोशल मीडियाच्या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी अवैध मार्ग वापरले. ग्राहक वाढवण्यासाठी कंपनीने तंत्रज्ञान आणि सेवा यावर भर द्यायला हवा होता. पण, त्यांनी एकतर स्पर्धा संपवली किंवा प्रतिस्पर्धी कंपन्या विकत घेऊन त्यांचं स्वतंत्र अस्तित्व संपवलं.
खासकरून व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या दोन कंपन्या मेटाने ज्याप्रकारे विकत घेतल्या त्यावरून हा वाद सुरू झाला आहे. व्यापार प्राधिकरणाने मेटावर स्पर्धा संपवण्याचा आरोप केला आहे. त्यांचे वकील डॅनियल मेथसन यांनी मेटावर आक्रमक रणनीती वापरून स्पर्धा संपवल्या आरोप केला आहे. ‘इन्स्टाग्रामची लोकप्रियता वाढते आहे, असं बघितल्यावर आपल्याकडचं आर्थिक सामर्थ्य वापरून मेटाने कंपनी विकत घेतली. उलट त्यांनी इन्स्टाग्रामला फेसबुकमध्ये आधुनिकता आणून टक्कर द्यायला हवी होती. इन्स्टाग्रामचं स्वतंत्र अस्तित्व पैशाच्या जोरावर संपवण्यात आलं,’ असा युक्तिवाद डॅनियल यांनी केला. (Mark Zuckerberg)
(हेही वाचा – Cabinet Decision 2025 : मंत्रीमंडळात ७ महत्त्वपूर्ण निर्णय; आता, नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार)
त्यावर मेटा कंपनीकडून मार्क झुकरबर्ग या सुनावणीसाठी हजर होते. त्यांचे वकील मार्क हानसेन यांनी आपल्या उत्तरात अमेरिकन कायद्यावर बोट ठेवलं आहे. ‘अमेरिकन कायदा कंपनीच्या विकासाच्या दृष्टीने दुसरी कंपनी विकत घ्यायला मनाई करत नाही. आम्ही फक्त दुसऱ्या कंपन्या विकत घेतल्या आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. हानसेन असं म्हणत असले तरी मध्यंतरी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी सहकाऱ्यांना पाठवलेले काही ईमेल लीक झाले होते. त्यातून वेगळीच कहाणी समोर येते. या ईमेलमध्ये झुकरबर्ग, ‘इन्स्टाग्रामची होत असलेली वाढ ही खूपच घाबरवणारी आहे,’ असं म्हटलं आहे. या ईमेलनंतर लगेचच झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने १ अब्ज अमेरिकन डॉलर देऊन इन्स्टाग्राम खरेदी केली. काही महिन्यांनी त्यांनी व्हॉट्सॲपच्या बाबतीतही तेच केलं. तब्बल १९ अब्ज अमेरिकन डॉलर मोजून त्यांनी व्हॉट्सॲप ताब्यात घेतली.
सध्या अमेरिकेत या खटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या दोन्हीचा ताबा सोडावा अशी थेट मागणी या खटल्यात करण्यात आली आहे. मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) अर्थातच ते नको आहे. त्यामुळे तो वॉशिंग्टन डीसीमधील जवळच्या लोकांशी ओळखी वाढवत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांबरोबर अलीकडे तो दिसतो. हा निर्णय तिथेच होणार असल्यामुळे तिथे राहण्यासाठी अलीकडेच त्याने वॉशिंग्टन डीसीमध्ये मोठं घरही खरेदी केल्याचं रॉयटर्सच्या एका बातमीत म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community