रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या कन्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे शब्द टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या पालकमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. (Raigad Politics)
(हेही वाचा – Nashik काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्यास सुरूवात ; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, ४ ते ५ पोलिस जखमी)
महाविकास आघाडीपासून महायुतीपर्यंत: रायगडच्या राजकारणाचा प्रवास
२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिले होते. यामुळे शिवसेनेचे रायगडमधील आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीने पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला खतपाणी घातले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर काही काळ राष्ट्रवादी सत्तेबाहेर होती, पण अजित पवार यांनी २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट घडवून महायुतीत प्रवेश केला. यानंतर आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या, आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा पेटला.
शिंदे सरकारचा निर्णय आणि तटकरे-गोगावले संघर्ष
शिंदे सरकारच्या सुरुवातीच्या काळात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेचे उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले, ज्यामुळे तटकरे कुटुंबीयांना धक्का बसला. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये फडणवीस सरकारने पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली, तेव्हा आदिती तटकरे यांचे नाव रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी समोर आले. यावर गोगावले समर्थकांनी तीव्र आक्षेप घेत आंदोलने केली, आणि अवघ्या २४ तासांत हे पालकमंत्रिपद स्थगित करण्यात आले.
अमित शहांचा रायगड दौरा आणि स्नेहभोजनाची डिप्लोमसी
११ एप्रिल २०२५ रोजी अमित शहा रायगड दौऱ्यावर आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर उपस्थित राहिलेल्या शहांनी सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आटोपला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते, पण गोगावले यांनी या भोजनाला दांडी मारली, ज्यामुळे त्यांची नाराजी पुन्हा स्पष्ट झाली.
सुनील तटकरे यांनी या भोजनादरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा केला. “ही कौटुंबिक भेट होती, पालकमंत्रिपदाचा विषय नव्हता,” असे तटकरे म्हणाले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस यांनी शहांना रायगडचे पालकमंत्रिपद (Raigad Guardian Minister) राष्ट्रवादीला देण्याबाबतचा फॉर्म्युला समजावून सांगितला.
(हेही वाचा – रुग्णालयातून बाळ चोरीस गेल्यास परवाना रद्द होणार ; Supreme Court चे राज्य सरकारला निर्देश)
फडणवीसांचा फॉर्म्युला आणि राष्ट्रवादीला प्राधान्य
महायुतीत पालकमंत्रिपदांचे वाटप करताना राष्ट्रवादीकडे सर्वात कमी पालकमंत्रिपदे असल्याचे फडणवीस यांनी शहांना सांगितल्याची माहिती आहे. यापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे होते, ते आता शिंदे गटाच्या प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला देणे भाग आहे, असा युक्तिवाद फडणवीसांनी केला.
याउलट, शिवसेनेच्या गोगावले समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी, “गोगावलेंना पालकमंत्रिपद न मिळाल्यास मोठा उठाव होईल,” असा इशारा दिला. मात्र, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावर शिंदे गटाला टोला लगावला. “शिंदे यांना आता भाजपकडून महत्त्व मिळत नाही. गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळणार नाही, हा निर्णय ठरलेला आहे,” असा दावा दानवे यांनी केला.
नाशिक-रायगड तिढा आणि महायुतीतील तणाव
रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रिपदाचाही तिढा कायम आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, तर बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे असले तरी भाजपच्या पंकजा मुंडे यांनी त्यावर दावा ठोकला आहे. एकूण चार जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांवरून महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
शहांचा दौरा कोणाच्या पथ्यावर?
अमित शहांच्या (Amit Shah) रायगड दौऱ्याने आणि तटकरे यांच्या स्नेहभोजनाने आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाच्या शक्यता वाढल्या आहेत. फडणवीसांचा तटकरेंना पाठिंबा आणि शहांचा दौरा यामुळे गोगावले यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, शिंदे गटाची नाराजी आणि गोगावले समर्थकांचा आक्रमक पवित्रा यामुळे हा वाद पुढेही तापण्याची चिन्हे आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय आता शहा आणि फडणवीस यांच्या पुढील भेटीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या सगळ्या घडामोडी रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणार का, आणि तटकरे (Sunil Tatkare) की गोगावले यांचा विजय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Raigad Politics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community