राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्या संदर्भात चार ते पाच दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पुणे येथे दिली. माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, शाळा उघडण्या संदर्भात राज्य कृती कोरोना कृती दला(टास्क फोर्स)ने प्रतिकूल मत व्यक्त केले होते. त्यामुळे शाळा उघडण्याबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत होणार निर्णय?
डेल्टा प्लस संदर्भात राज्यात चिंतेची सध्यातरी स्थिती नाही. त्यामुळे शाळा उघडण्याबाबत निर्णय होऊ शकतो. शुक्रवारी राज्य कोरोना कृती दलाची मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक आहे. या बैठकीत कृती दल काय मत व्यक्त करते, त्यावर शाळा उघडण्याचा निर्णय अवलंबून राहील, असेही टोपे यांनी सांगितले. प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत मात्र राज्य कोणतीही घाई करणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही टोपे म्हणाले.
(हेही वाचाः आरोग्यमंत्र्यांनी बंद केली शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’)
सरकार संभ्रमात
राज्य सरकारचे कोरोना विषयक सल्लागार सुभाष साळुंके यांनी ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटलेली आहे, तेथे शाळा उघडण्यास हरकत नाही, असे मत व्यक्त केले आहे. शालेय शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनांना 17 ऑगस्ट पासून शाळा उघडण्यास संमती दिलेली होती. मात्र राज्य कोरोना कृती दलाच्या प्रतिकूल मतामुळे शाळा उघडण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. एकूणच, शाळा उघडण्याबाबत सरकार संभ्रमात असून पालक मोठ्या प्रमाणावर गोंधळात पडले आहेत.
Join Our WhatsApp Community