‘त्या’ देशात माता तान्ह्या मुलांना का फेकतायेत? 

अफगाण महिला आपल्या तान्ह्या बाळांना सुरक्षिततेसाठी त्यांना इतरांकडे सोपवण्यासाठी विवश झाल्या आहेत. महिला विमानतळाच्या गेटवर लावण्यात आलेल्या काटेरी तारांवरून मुलांना आत असलेल्या सैनिकांकडे फेकत आहेत.

145

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर या देशात अनागोंदी माजली आहे. अफगाण नागरिक देशाबाहेर पडण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करत आहेत. मोठ्या संख्येने अफगाण लोक काबूल विमानतळावर पोहचत आहेत. त्यांना आशा वाटते कि, कोणीतरी त्यांना अफगाणिस्तानबाहेर घेऊन जाईल. काबूल विमानतळावर हजारो लोकांची गर्दी आहे. यात महिला आणि मुलेदेखील आहेत. तिथे चारही बाजूला आरडाओरडा, गोंधळ, पळापळ सुरू आहे. अफगाण महिला रडून अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिकांकडे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा, मुलांचा जीव वाचवावा म्हणून याचना करत आहेत. सगळ्याचा डोळ्यांत अश्रू आणणारी घटना म्हणजे त्या ठिकाणी अफगाण माता-भगिनी त्यांच्या तान्हुल्यांना अमेरिकन सैनिकांच्या हातात सोपवून निदान आपली मुले तरी जीवंत राहतील, अशा अपेक्षेने त्या काळजाचा तुकडा सोपवून देत होते.

सैनिकही हतबल!

‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळ सध्या अमेरिकन आणि ब्रिटिश  सैनिकांच्या ताब्यात आहे. तर बाहेर तालिबानी सैन्य तैनात आहेत. अफगाणिस्तान सोडण्याच्या आशेने विमानतळावर पोहचणाऱ्या महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्या रडून, हात जोडून विनवण्या करुन अमेरिकन तसेच ब्रिटिश सैनिकांकडे जीव वाचवण्यासाठी याचना करत आहेत. मात्र प्रत्येक व्यक्तीची मदत करणे या सैनिकांना शक्य नाही. ही परिस्थिती सैनिकांनादेखील हताशपणे पहावी लागते आहे. अफगाण नागरिकांचे, महिलांचे आणि मुलांचे होत असलेले हाल पाहून त्यांनादेखील दु:ख होत आहे आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत.

आपल्या मुलांना फेकण्यास अफगाण महिला विवश!

अफगाण महिला आपल्या तान्ह्या बाळांना सुरक्षिततेसाठी त्यांना इतरांकडे सोपवण्यासाठी विवश झाल्या आहेत. महिला विमानतळाच्या गेटवर लावण्यात आलेल्या काटेरी तारांवरून मुलांना आत असलेल्या सैनिकांकडे फेकत आहेत. एका महिलेने आपल्या छोट्याशा मुलीला तारेवरून पलीकडे फेकले तेव्हा दुसऱ्या बाजूला असलेल्या ब्रिटिश सैनिकाने त्या मुलीला अलगद झेलले. त्या महिलेची ती दयनीय स्थिती पाहत आणि त्या एवढ्या निरागस जिवांचे हाल पाहत त्या सैनिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

सैनिकाने हवेतच झेलले मुलाला

एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले की, अफगाण महिला इतक्या भीतीमध्ये आणि दहशतीत आहेत की आपल्या मुलांना काटेरी कुंपणावरून ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिकांकडे फेकत आहेत. जेणेकरून तालिबान्यांपासून आपल्या मुलांचे रक्षण व्हावे. गर्दीत असलेली एक महिला जोरात किंचाळत म्हणाली की, माझ्या मुलाला वाचवा. त्यानंतर तिने सैनिकांकडे त्या मुलाला फेकले. सुदैवाने सैनिकांनी त्या मुलाला अलगद हवेतच झेलले आणि त्याचा जीव वाचला.

एक तुर्की महिला सैनिक सांभाळतेय तान्हा जीव

स्वत:च्या व आपल्या मुलांच्या सुरक्षतेसाठी अफगाण नागरिक पळापळ करत असताना, दोन महिन्यांचा एक तान्हा जीव आपल्या पालकांपासून वेगळा झाला तेव्हा तुर्कीच्या एका महिला सैनिकाने त्या तान्हयाच्या सुरक्षतेची जबाबदारी घेतली आहे.

सैनिक करू इच्छितात मदत

ब्रिटिश सैन्याधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिथे एकही व्यक्ती असा नाही जो दु:खी नाही. ज्याला हे दु:खाचे, भीतीचे, दहशतीचे आणि हताशेचे वातावरण पाहून अश्रू आले नाही. ते सर्वच मदत करू इच्छितात. परंतु प्रत्यक्षात एवढ्या सर्व अफगाण लोकांची मदत करणे शक्य नाही. विमानतळावर जेव्हा एका महिलेने रडत-रडत एका अमेरिकन सैनिकाकडे आपले मुलं दिले तेव्हा तो सैनिक नकार देऊ शकला नाही. जवळपास ५,२०० अमेरिकन सैनिक सध्या काबूल विमानतळावर तैनात आहेत. आपल्या देशातील नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर ते सर्व इथून निघून जातील. अर्थात या सैनिकांनी हताशपणाचे जे दृश्य काबूल विमानतळावर पाहिले आहे ते आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.