शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता पक्षाला कंटाळलाय!

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पालघर जिल्ह्यातही चर्चेला आली आहे.

129

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जस जशी जन आशीर्वाद यात्रा पुढे पुढे सरकत आहे, तस तशी ती विविध कारणांनी चर्चेत येत आहे. ही यात्रा शनिवारी वसईत पोहचली. त्याठिकाणी नारायण राणे मोठा गौप्यस्फोट केला. त्यामध्ये त्यांनी थेट शिवसेनेत भूकंप होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा पालघर जिल्ह्यातही चर्चेला आली आहे.

काय म्हणाले नारायण राणे? 

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी राणेंनी हा मोठा दावा केला  आहे. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असे सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणले. माझ्यावर टीका केली की मंत्रिपद मिळते, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई असो वा वसई-विरार. आमच्या हाती सत्ता द्या. आम्ही विकास करून दाखवू, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा : राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या विरोधात गुन्हे दाखल!)

राज्याने लस खरेदी करावी

वसई-विरारमध्ये इमारती झाल्या. पण बेकारी कायम आहे. आजूबाजूला इमारती झाल्या. पण विकास झाला नाही. मुंबईला जायला रस्ते नाहीत. लसीसाठी स्वत: राज्यसरकारचा बजेट आहे. त्यांनी आपल्या लोकांसाठी लस खरेदी करावी, पण टक्केवारी घेऊ नये, असा टोला लगावतानाच राज्याचा मुख्यमंत्री बदलाला तरी राज्याचा विकास होतो, असेही ते म्हणाले.

पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी सल्ला देऊ नये

आम्ही गर्दी वाढवत नाही. लोक गर्दी करत आहेत. काही लोकांना बघून लोक तोंड फिरवतात. आम्ही गाडी भरून माणसं आणत नाहीत. आमच्यासाठी लोक थांबतात. माझ्या आयुष्यात जे पद मिळाले ते लोकांमुळे मिळाले. मला पिंजऱ्यात बसून काही मिळाले नाही. जे काही मिळालं ते जीव धोक्यात घालूनच मिळालं आहे. त्यामुळे पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.