विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार!

महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाग्रस्त लहान मुलांवर उपचार करण्यात येतील, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

188

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लहान मुलांसाठीही कोविड काळजी केंद्राची उभारणी केली जात आहे. अशाच प्रकारे कलिना विद्यापीठ कॅम्पसमधील आय.टी. पार्कमध्ये लहान मुलांसाठी ३० खाटांचे कोविड काळजी केंद्र उभारण्यात आले असून याचे हस्तांतरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेला शनिवारी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

मुलांसाठी मनोरंजनाकरता १२०० चौरस फूट एवढी जागा

लहान मुलांसाठी असलेल्या कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळामध्ये आहे. याठिकाणी ३० रूग्ण खाटा असून १२ वर्षांखालील लहान मुलांसाठी मनोरंजनाकरता १२०० चौरस फूट एवढी जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष असून कोरोनाग्रस्त लहान मुलांसोबत पालकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर आवश्यकता असल्यास ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

(हेही वाचा : शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता पक्षाला कंटाळलाय!)

बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार!

लहान मुलांना आवश्यक असणारी औषधे या केंद्रावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रावरील तीव्र आजार असलेल्या लहान मुलांना पुढील उपचाराकरिता विभागीय वॉर रूममार्फत रुग्णालयात भरती केले जाईल. ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध आहे. २४ तास स्वच्छतेकरता व सुरक्षितेकरता कर्मचारी वर्ग उपलब्ध असतील. महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाग्रस्त लहान मुलांवर उपचार करण्यात येतील, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक शिवसेना आमदार संजय पोतनीस, सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब, नगरसेवक दिनेश कुबल उपायुक्त (परिमंडळ -३) पराग मसुरकर, एच/ पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे उपस्थित होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.