कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लावलेले निर्बंध अद्यापही पूर्णपणे हटवले नाहीत, त्यामुळे अजूनही सण – उत्सवांवरील बंदी कायम आहे. अशा वेळी येत्या आठवड्यात होणारा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय भाजपा आणि मनसे या राजकीय पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील काही प्रमुख गोविंदा पथक आणि दहीहंडी उत्सव आयोजक यांच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवार, २३ ऑगस्ट रोजी मंत्रालयात व्हर्च्युअल बैठक होणार आहे. त्यामध्ये यंदा दहीहंडी उत्सव साजरा करायचा का, यावर निर्णय होणार आहे.
‘या’ विषयावर होणार चर्चा!
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सध्याच्या कोरोना संसर्गाची स्थिती मांडणार आहेत. हा उत्सव प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. त्यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतील. जर मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली, तर मग त्यासंबंधी नियमावली बनवून त्यानुसार उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा : शिवसेना म्हणते, ‘मोदी नामा’ची जादू उतरली! सक्षम पर्याय उभा करा!)
भाजपा, मनसेने केली तयारी!
दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी मात्र मागील आठवड्यापासूनच यंदा दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार त्यांच्या दहीहंडी पथकांनी सरावाला सुरुवातही केली आहे. तर या पक्षाच्या दहीहंडी उत्सव आयोजकांनी दहीहंडी बांधण्याची तयारी केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहीहंडी वरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी दहीहंडी उत्सव मंडळांच्या बाजूने भाजपा आणि मनसे या पक्षांनी उभे राहून एक प्रकारे जनमत भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. अशावेळी शिवसेनेला हे अडचणीचे ठरू शकेल, म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनीही दहीहंडी उत्सव मंडळांची बैठक बोलावली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात सरकारने बंदी केली होती, त्यामुळे यंदा हा उत्सव साजरा करणारच, अशी भूमिका मंडळांनी घेतली आहे.
Join Our WhatsApp Community