राणेंच्या विरोधात मुंबईत तणाव! शिवसैनिक – राणे समर्थक भिडणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून, मध्यरात्रीच दादरमध्ये नारायण राणेंचे मोठ्या आकाराचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले असून त्यावर ‘कोंबडी चोर’ असं लिहिलेलं आहे.

121

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून, मध्यरात्रीच दादरमध्ये नारायण राणेंचे मोठ्या आकाराचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले असून त्यावर ‘कोंबडी चोर’ असं लिहिलेलं आहे. त्यामुळे टीका करणाऱ्या राणेंच्या वर्मावर शिवसेनेने बोट ठेवले आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्याविरोधात मध्यरात्रीच दादरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेट घोले यांनी दादर टीटी परिसरात पोस्टरबाजी केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या एक तासात हे पोस्टर हटवले आहेत. राणेंविरोधात लावलेले हे पोस्टर जरी काढून टाकले असले तरी या पोस्टर्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. या पोस्टरमध्ये राणेंचा क्लोजअप फोटो लावून त्याच्या बाजूला कोंबडी चोर असं लिहिण्यात आलं आहे. याखाली पोस्टर लावणारे नगरसेवक घोले यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

म्हणून राणे-शिवसेना वाद पेटणार

सोमवारी रायगडमधील महाड येथे राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचवेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाचा उल्लेख करत, “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं म्हटले होते. या वक्तव्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

निलेश- नितेश राणेंचा इशारा…

राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरुन रात्री राणेंच्या जुहूतील घराबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांना जमण्यास सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच नितेश राणेंनी सिंहाच्या गुहेमध्ये प्रवेश करण्याची हिंमत करु नका, असा इशारा शिवसेनेला दिला आहे.

राणेंवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तर नाशिकमध्ये पोलिसांच्या सायबर सेलकडून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.