पालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने १२ ऑगस्ट २०२१ला शालेय शुल्कात १५% कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु अद्यापही अनेक शिक्षण संस्थांनी शासन निर्णय धुडकावून लावत शुल्क कपात केली नाही. हे लक्षात येताच सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने शाळा उपसंचालकांची भेट घेतली. यावेळी तात्काळ सर्व शाळांना शासन आदेशानुसार १५% फी सवलत देण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निर्देश देण्यात येतील, असे शिक्षण उपसंचालकांनी सांगितल्याची माहिती मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी दिली आहे.
शाळांनी नियम धुडकावला
कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आल्याने, त्याचा सामाजिक व आर्थिक पातळीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे लोकांच्या हाती रोजगार नव्हता आणि जमा असलेला पैसा खर्च झाला, अशा अवस्थेत मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना अजून आर्थिक तडजोड करायला लागत आहे. पालकांच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने १२ ऑगस्ट २०२१ ला शालेय शुल्कात १५% कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु अद्यापही अनेक शिक्षण संस्थांनी शासन निर्णयाला न जुमानता शुल्क कपात केली नाही.
(हेही वाचाः खाजगी शाळांच्या फी मध्ये कपात… राज्य सरकारचा निर्णय)
मनविसेने केली कारवाईची मागणी
ही बाब लक्षात येताच सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, मनसे विभाग अध्यक्ष धनराज नाईक, वैभव शिंदे, किरण कदम यांनी शिष्टमंडळासह शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांची भेट घेतली. महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांत शालेय शुल्कामध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय धुडकावणाऱ्या शालेय व्यवस्थापनांवर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. त्यावर शासनाच्या निर्णयानुसार सर्व शाळांनी फी मध्ये १५% सवलत देण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येतील, असे शिक्षण उपसंचालकांनी सांगितले असल्याचे मनविसेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
(हेही वाचाः शिवसेनेला रिलायन्सकडून ‘बूस्ट’र)
Join Our WhatsApp Community