कोळीवाड्यांवर कुणाची वक्रनजर?

कोळीवाड्यांवर आता धनदांडग्यांची वक्रदृष्टी पडलेली असून, कोळीवाडे नष्ट करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

242

मुंबईत सध्या मासे विक्री होत असलेल्या मंडयांची (मार्केट) बांधकामे तोडून, परवानाधारक मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी भगिनींना रस्त्यावर आणण्याचे काम केले जात आहे. याविरोधात आता कोळी भगिनींनी रस्त्यावर उतरण्याचा एल्गार पुकारला आहे. असे असले तरी आधी ऑनलाईन मासे विक्रीचा व्यवसाय आणि त्यानंतर माशांचा वास येतो म्हणून मार्केटवरील कारवाई, म्हणजे मुंबईतील आद्य नागरिक असलेल्या कोळी बांधवांना त्यांच्या कोळीवाड्यांपासून हद्दपार करण्याचा डाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मुंबईच्या समुद्र किनारी वसलेल्या कोळीवाड्यांवर आता धनदांडग्यांची वक्रदृष्टी पडलेली असून, त्यातून मार्केटवर कारवाई करुन कोळीवाडे नष्ट करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेची कारवाई

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोळी भगिनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक झाल्याने त्यातील तळ अधिक दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यामुळे तळ मजल्यावरील घाऊक आणि किरकोळ परवानाधारक मासे विक्रेत्यांना तात्पुरती नवीन शेड बांधून होईपर्यंत आपला व्यवसाय बंद करुन बसावे लागले आहे. काहींनी भाऊच्या धक्क्यावरच आपले बस्तान बसवले, परंतु तिथेही त्यांना पोलिसांचा त्रास होत आहे.

(हेही वाचाः वाचा…असा झाला कोळी महिलांसोबत धोका!)

कोळी बांधव करणार आंदोलन

यातून कोळी भगिनी सावरत नाही, तोच दादरमधील गोड्या पाण्यातील मासे विक्रीचे मार्केट असलेल्या मिनाताई ठाकरे मासे विक्रीच्या मार्केटवर महापालिकेने कारवाई केली. याठिकाणी गोड्या पाण्यातील घाऊक माशांबरोबरच खाऱ्या पाण्यातील माशांची विक्री करणाऱ्या दहा ते बारा कोळी भगिनी व्यावसाय करत आहेत. त्या सर्वांना महापालिकेने मरोळ येथील मंडईत जागा दिली आहे. परंतु या महिलांनी तिथे जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांना त्यांचे परवाने रद्द करण्याची भीती दाखवली जात आहे. गोड्या पाण्यातील माशांच्या मार्केटवर कारवाई करताना समुद्रातील मासे विकणाऱ्या महिलांसाठी तेथीलच जागेत शेड उभारुन देणे आवश्यक होते. परंतु एकप्रकारे कोळी भगिनींवर महापालिकेने अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व कारवाईच्या विरोधात येत्या बुधवारी कोळी बांधवांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोळीवाडे नष्ट करण्याचे संकेत

आधीच पुनर्विकासाच्या नावाखाली मंडयांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे एका बाजूला मंडयांची दुरावस्था करुन त्या बंद करण्याचा घाट घातला जात आहे, तर दुसरीकडे ऑनलाईन मासे विक्रीच्या व्यवसायाला चालना दिली जात आहे. चित्रपट अभिनेते अनिल कपूर यांची एक जाहिरात सर्वांना भुरळ पाडत आहे. समुद्रातून अवघ्या २५ मिनिटांमध्ये मच्छी आपल्या घरी, अशा आशयाची ही जाहिरात कुठेतरी मुंबईतील मार्केट संपुष्टात आणण्याचा आणि पर्यायाने कोळीवाडे नष्ट करण्याचे संकेत देत आहेत.

(हेही वाचाः कोळी महिलांसाठी प्रशासनाने अखेर निर्णय बदललाच… काय आहे हा निर्णय?)

नुकसान भरपाई कोण देणार?

कोळी भगिनींच्या म्हणण्यानुसार आम्ही परवानाधारक आहोत. त्यामुळे एखादे मार्केट धोकादायक झाले म्हणून जेव्हा पाडले जाते, तेव्हा पर्यायी व्यवस्था महापालिकेनेच उपलब्ध करुन द्यायला हवी. बांधकाम पूर्ण होईपर्यंत मासे विक्री काही थांबवू शकत नाही आणि थांबवली तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार, असा सवाल त्यांनी केला आहे. यामागे कोळ्यांना हद्दपार करण्याचा डाव असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे.

कोळी भगिनी रस्त्यावर आल्या तर?

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी ऑनलाईन मासे विक्री करण्याच्या व्यवसायालाच आमचा विरोध आहे, असे सांगितले. माशांचा वास येतो म्हणून मार्केट तोडली जातात, उद्या जर ऑनलाईन मासे विक्री सुरू झाली तर कोळी भगिनी रस्त्यावर येतील. कुणीही मासे खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये येणार नाही. त्यामुळे मार्केट बंद करावी लागतील आणि पर्यायाने कोळीवाडेही संपुष्टात आणले जातील, असे त्यांनी सांगितले. माशांचा टॉलर्स हा १५ दिवसांनी येतो. मग ऑनलाईन मासे समुद्रातून काढून ३० मिनिटांमध्ये कसे देणार, असा सवाल त्यांनी केला. जाहिरात करणाऱ्या अनिल कपूरचे कुठले खानदान मासे विक्री करत होते तेही कळू द्या, असा सवाल त्यांनी केला.

(हेही वाचाः खुशखबर! मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव, धरणे भरली!)

कोळीवाडे ओस पडतील

मच्छिमारांचे नेते देवेंद्र दामोदर तांडेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज मंडई ही मासे विक्रीचे एपीएमसी मार्केट असल्याचे सांगितले. याठिकाणी मुंबईतील १०८ मंडईतील कोळी भगिनी मासे खरेदीला येत असतात. पण त्यांना ऐरोलीला पाठवून अप्रत्यक्ष हा व्यावसायच बंद करण्याचा घाट घातला जात आहे. याठिकाणी मार्केट झाल्यास कोळी भगिनी तिथेच राहायला जातील आणि कोळीवाडे ओस पडतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.