केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेत महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे नाशिक सायबर पोलिस ठाण्यात राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. मंगळवारी, २४ ऑगस्ट रोजी राणे यांची यात्रा चिपळूण येथे होणार आहे.
नाशिक पोलिसांची अटकेची तयारी
राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी केल्यामुळे शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‘आरोपी हे माननीय भारत सरकारचे मंत्री आहेत. त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांची बदनामी करणारे वक्तव्य करून त्यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना अटक करून न्यायालयात हजर करा’, असे आदेशात म्हटले आहे.
आम्ही रात्री १ वाजता तक्रार केली आहे. राणे हे स्वतः मुख्यमंत्री होते, त्यांना पदाची गनिमा माहित आहेत, त्यांनी भावना दुखावणारी, असंविधानिक वक्तव्य केले आहे. राणेंना मंत्रिपदावरून हटवावे.
– सुधाकर बडगुजर, तक्रारदार
राणेंना अटक होणार का?
याप्रकरणी नाशिक पोलिस आयुक्त पांडे यांनी पहाटे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राणेंच्या विरोधात भादंवि ५००, ५०२, १५३ ब (१) हे कलम लावण्यात आले आहेत.
म्हटले होते नारायण राणे?
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयात भाषण करताना मुख्यमंत्री हिरक महोत्सव म्हणत होते, त्यांना अमृत महोत्सव हे माहित नव्हते, मी तिकडे असतो तर कानाखाली मारली असती, असे वक्तव्य राणे यांनी वक्तव्य केले होते.