केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या या यात्रेत त्यांनी शिवसेनेला टीकांचे प्रसाद वाटप करायला सुरुवात केली. सोमवारी चिपळूण येथे बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हात उचलण्याची भाषा केली. त्यावरुन वातावरण तापलेले असतानाच, मंगळवारी संगमेश्वर येथील सभेत त्यांनी पुन्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. हिंदुत्वाशी गद्दारी करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, अशी आक्रमक टीका त्यांनी यावेळी केली.
ते शेवटची धडपड करत आहेत
राणेंच्या संगमेश्वर येथील जन आशार्वाद यात्रेदरम्यान शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी पुन्हा नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. समोर घोषणा देणारे काही दिवसांनी सत्तेत नसतील. त्यांचे फक्त 56 आमदार आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करत त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले आहे, असे विधान नारायण राणे यांनी यावेळी केले. राज्यात सत्ता असताना केवळ 12 झेंडे घेऊन निषेध करायला आले आहेत. पण मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, शेवटची धडपड करत आहेत. त्यामुळे मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी शिवसैनिकांना जायला सांगावं नाहीतर आम्हाला त्यांना घरी पाठवावं लागेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी टीका केली आहे.
हाच वाजपेयींचा भाजप पक्ष?
त्यांनी आम्हाला दोन हात करायचे आव्हान दिले होते, त्याप्रमाणे आम्ही इथे आलो. पण ते आम्हाला घाबरुन पोलिसांच्या मागे लपून बसले. त्यामुळे आमचे आंदोलन यशस्वी झाले आहे, असे युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केले आहे. आमच्या पक्ष प्रमुखांवर कोणी हात उचलण्याची भाषा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला आजवर असं वाटतं की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून भाजप कार्यकर्त्यांवर चांगले संस्कार केले जातात. पण हेच ते संस्कार का? प्रसाद लाड शिवसेना भवन फोडण्याची भाषा करतात, नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर हात उचलण्याची भाषा करतात, हीच वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांची शिवसेना आहे का, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community