मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचे वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली असून, नारायण राणे यांना पोलिसांनी चक्क जेवणावरुन उठवले. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांना ही माहिती दिली असून, आता कोकणात राडे होण्याची शक्यता आहे.
प्रसाद लाड यांचा आरोप
तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असे आम्ही पोलिसांना सांगितले. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होते, त्यांचा ECG करायचा होता, त्यांना काहीही करू दिले नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचले, असे म्हणत प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांनी अजूनही अटकेची कागदपत्रे दाखवलेली नाहीत. राणे साहेबांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केला आहे.
(हेही वाचाः नारायण राणे यांना अखेर अटक!)
विविध ठिकाणी गुन्हे दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
नोटीस न देताच अटक
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नोटीस न देताच अटकेच्या करवाईचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र कोर्टाने योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश वकिलाला देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
(हेही वाचाः राणेंच्या विधानाचे समर्थन नाही, पण… काय म्हणाले फडणवीस?)
राणेंची प्रकृती बिघडली
राणे यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत आहे. राणे लवकरच रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. नारायण राणे यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
Join Our WhatsApp Community