मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी आणि चिटणीस केतन नाईक यांच्या नेतृत्वातील मनसेच्या शिष्टमंडळाने २४ ऑगस्ट रोजी शिवसेना नगरसेवक/बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांची कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेतली. मुंबईची दुसरी लाईफलाईन मानली जाणारी बेस्टसेवा मुंबईकरांच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. कालांतराने बेस्ट सेवेतील कामगार आणि बसेस कंत्राटी तत्वावर येऊ लागल्या व त्या माध्यमातून आज अनेक कंत्राटी कामगार बेस्ट उपक्रमाअंतर्गत कार्यरत आहेत.
कंत्राटी कामगारांवर अन्याय
कोविड काळात लोकल सेवा बंद असताना याच कंत्राटी कामगारांनी बेस्ट बसेसवर अवलंबून असणाऱ्या मुंबईकरांना आपला जीव धोक्यात घालून सेवा पुरवली. परंतु या कामगारांना कामावर येण्यासाठी बेस्ट प्रशासन साधा मोफत बेस्ट प्रवास देखील देण्यास तयार नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी आशिष चेंबूरकर यांच्याकडे व्यक्त केली. इतकेच नाही तर कायम कामगारांच्या तुलनेत कमी वेतन व हीन वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी कंत्राटी कामगार करत आहेत. वार्षिक वेतनवाढ व अनेक इतर सुविधांपासून कंत्राटी कामगारांना वंचित ठेवण्यात येत आहे.
(हेही वाचाः मुंबईत गुरुवार ते शुक्रवार पर्यंत १० टक्के पाणी कपात)
सुधारित टेंडर काढावे
गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट समिती महापालिकेचे अध्यक्षपद सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडे आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना खाजगीकरणाने इतके झपाटले आहे की मुंबईकरांच्या हक्काचे ‘कंडक्टर काका’ म्हणजे बसवाहक देखील कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा घाट बेस्ट प्रशासनाने घातला आहे. बस कंडक्टर पुरवण्याचे काम मे.मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या कंपनीला देण्यात आले असून, ते अद्याप सुरू झालेले नाही. म्हणूनच अशा पद्धतीचे टेंडर सुरु होण्यापूर्वीच बेस्ट प्रशासनाने त्वरित रद्द करावे आणि नव्याने सुधारित टेंडर काढावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.
कुंपण शेत खाण्याचा प्रकार
सध्याच्या स्थितीत मे. एम.पी. ग्रुप (पुणे), मे.मारुती ट्रॅव्हल्स (अहमदाबाद), मे. हंसा सिटीबस (नागपूर) अशा कंपन्यांच्या मार्फत कंत्राटी कामगार व बसेस पुरवल्या जात आहेत. परंतु या बसेसवर बस कंडक्टरचे काम मात्र बेस्ट उपक्रमातील कायम कामगार करत आहेत. मग आत्ताच बस कंडक्टर कंत्राटी पद्धतीने का घेण्यात येत आहेत, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे टेंडर बनवले त्याच अधिकाऱ्यांनी बेस्टची नोकरी सोडून नव्याने टेंडर मिळालेल्या कंपनीची नोकरी स्वीकारली आहे, अशी माहिती मिळाल्याने हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार असल्याचे केतन नाईक यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः राज्यातील ‘या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती)
Join Our WhatsApp Community