शिवसेना राणेंच्या विरोधात रस्त्यावर, भाजपने उरकले गिरगाव चौपाटीवरील प्रसाधनगृहाचे लोकार्पण

132

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या स्वराज्य भूमी अर्थात गिरगांव चौपाटीवर येणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने फिरत्या वाहनावरील निर्वात प्रसाधनगृह(मोबाईल टॉयलेट) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याचे लोकार्पण सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल आणि स्थानिक नगरसेविका अनुराधा पोतदार यांच्या हस्ते पार पडले. एरव्ही सर्व प्रकारच्या उद्घाटनासाठी पुढे धावणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर हे नारायण राणे यांच्या निषेध करत असताना, भाजपच्या दोन नगरसेविकांनी स्वराज्य भूमीवरील या प्रसाधनगृहाचे लोकार्पण पार पाडत सत्ताधारी पक्षावर मात केली आहे.

६ महिने राहणार कार्यरत

गिरगांव चौपाटीवर येणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने मोबाईल टॉयलेट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तब्बल ९० टक्के पाणी बचत करण्याची क्षमता असलेल्या या प्रसाधन गृहातील निर्वात यंत्रणा सौर ऊर्जेवर चालते. संपूर्णपणे पर्यावरणस्नेही असे हे प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पुढील ६ महिने कार्यरत राहणार आहे. या सुविधेचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका अनुराधा पोतदार, उप आयुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्त्या व सिटीझन्स अॅक्शन नेटवर्क संस्थेच्या पदाधिकारी सिचइंद्राणी मलकानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

IMG 20210824 WA0075

(हेही वाचाः कोळीवाड्यांवर कुणाची वक्रनजर?)

सौर ऊर्जेवरील यंत्रणा

महिलांसाठी १ आणि पुरुषांसाठी १ अशी एकूण २ शौंचकुपे असलेले हे प्रसाधनगृह एका वाहनावर स्थित आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी नेऊन प्रसाधनगृह सुविधा पुरवता येते. प्रत्येक फ्लशमध्ये सुमारे सव्वा लिटर पाण्याचा उपयोग या शौंचालयात होतो. त्यामुळे २०० लीटर पाण्याचा उपयोग करुन जवळपास १०० फ्लश करता येते. सर्वसाधारण प्रसाधनगृहांमध्ये २०० लीटर पाण्यात २० फ्लश होतात. म्हणजेच प्रत्येक फ्लशमध्ये किमान १० लीटर पाणी वापरात येते. या हिशोबाने सदर निर्वात प्रसाधनगृहामध्ये तब्बल ९० टक्के पाण्याची बचत होते. या प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर ऊर्जेवर कार्यरत राहते. त्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. मेसर्स व्हॅकमॅन सॅनिटेशन सोल्यूशन प्रा. लि. यांच्यावतीने महापालिकेला हे प्रसाधनगृह पुढील ६ महिन्यांसाठी विनामूल्य तत्त्वावर पुरवण्यात आले आहे.

(हेही वाचाः बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार?)

हे प्रसाधनगृह २४ बाय ७ उपलब्ध राहणार असून, त्यासाठी २ वाहन चालक नेमले आहेत. सद्यस्थितीत हे प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पर्यटकांना वापरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. चौपाटीवर देशभरातून आणि विदेशातून देखील पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.