मंगळवारी दिवसभर नारायण राणेंचे अटकसत्र देशभर गाजले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या नारायण राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिका-यांकडून नारायण राणेंना अखेर जामीन मंजूर झाला आहे.
असे रंगले अटकसत्र
राणेंच्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांच्यावर पुणे, नाशिक, महाड याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणे यांना अटक होणार असे वातावरण मंगळवारी सकाळपासून तयार झाले होते. आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर येथे असताना, दाखल झालेल्या गुन्ह्यांबद्दल राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु हा अर्ज रत्नागिरी न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंच्या चिंतेत वाढ झाली होती. अखेरीस महाड न्यायदंडाधिका-यांनी राणेंचा जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची सुटका झाली आहे.
जामीन मंजूर
संगमेश्वर येथून राणेंना दुपारी अटक केल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. महाड येथे गुन्हा दाखल झाल्याबद्दल त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास त्यांना महाड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. महाड येथे न्यायदंडाधिका-यांसमोर याप्रकरणी तासभर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायदंडाधिका-यांनी राणेंचा जामीन मंजूर केला.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणे यांनी केलेले वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. महाड पोलिसांनी नारायण राणे यांची 7 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
राणेंच्या वकिलांचा युक्तीवाद
दुसरीकडे राणेंच्या वकिलांनी युक्तीवाद करताना, नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे सार्वजनिकरित्या केले आहे, त्यामुळे त्यामागे कुठलेही कटकारस्थान नाही, असे सांगितले. तसेच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी राणेंवर गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी केला. अटकेसाठी पोलिसांकडून राणे यांना कुठलेही अटक वॉरंट देण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच राणेंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी राणेंच्या वकिलांकडून करण्यात आली. या युक्तीवादनंतर नारायण राणे यांना जामीन मंजूर झाला आहे.
Join Our WhatsApp Community