मुंबईत एकवेळ अतिक्रमण करुन झोपडी बांधणाऱ्यांचे बांधकाम अधिकृत धरून त्यांना इमारतीत पक्के घर मिळेल. त्यांनी झोपड्यांवर मजले चढवत उंच बांधकाम केले तरी त्यांच्यावर बांधकाम करायचे नाही. पण मुंबईचा आद्य नागरिक असलेल्या कोळी बांधवांनी आपल्या घराची उंची वाढवली तर नियमांवर बोट दाखवून त्यांच्या घरांवर कारवाई केली जात आहे. मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांवर अन्याय करणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून बांधकामाला परवानगी मिळत नसल्याने कोळीवाड्यातील अनेक घरांवर बुलडोझर चढवला जात आहे.
कोळीबांधवांच्या स्वतःच्याच जागेत वाढीव बांधकाम केले तरी हातोडा
मुंबईत असलेल्या कोळीवाड्यांपैकी मालाड मढ मार्वे येथील कोळीवाड्यातील वाढीव बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे. मुंबईत अश्याप्रकारे वारंवार कारवाई होत आहे. एका बाजूला वाढत्या झोपडपट्टीच्या बांधकामांवर कुठेच कारवाई केली जात नाही. त्यांना संरक्षण दिले जाते आणि कोळीवाड्यांमधील भूमिपुत्र असलेल्या नागरिकांच्या घरांवर कारवाई केली जात आहे. झोपडपट्टी आणि चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांचे कुटुंब वाढल्याने त्यांना वाढीव उंचीचे बांधकाम करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून केली जाते, दुसरीकड़े कोळीवाड्यातील ज्या कोळी बांधवांनी आपल्या जागेत वाढीव बांधकाम केले त्यावर हातोडा चालवला जात आहे. कोळी लोकांचीही कुटुंबे वाढत आहेत. मच्छीमारी या पारंपरिक व्यवसायाकरता त्यांना जाळी इतर समान, वस्तू ठेवण्यासाठी मोठ्या जागेची गरज असते. त्यामुळे आपल्याच जागेवर केलेल्या बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. मागील सहा वर्षांपूर्वी वर्सोवा कोळीवाडा येथील तत्कालीन शिवसेना नगरसेविका छाया भानजी यांच्या घरावर हातोडा चालवला होता. तर त्यांनतर वर्सोवा येथील कोळीवाड्यात अनेक वाढीव बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. कोणत्याही अनधिकृत बांधकामाचे समर्थन करता येत नसले तरी भूमिपुत्र असलेल्यांवर अन्याय करायचा आणि अतिक्रमण करणाऱ्याकडे दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही. जर झोपडीत राहणारी माणसे आहेत, तर मग कोळीवाड्यात राहणारीही माणसेच आहे. त्यांच्या किमान स्वतःच्या जमिनी आहेत. त्यावर ते बांधकाम करतात.
(हेही वाचा : कोळीवाड्यांवर कुणाची वक्रनजर?)
कोळीबांधवांच्या घरांवरील कारवाई चुकीचे – देवेंद्र तांडेल
अखिल महाराष्ट्र मच्छीमार संघाचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी याबाबत माहिती देताना मालाड मढ मार्वे येथील कोळीवाड्यातील घरांवर सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये दोनदा ही कारवाई झाली आहे. इतर कोळीवाड्यातही ही कारवाई होत आहे. मुंबईतील अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या जात आहे. त्या झोपड्या मग वाढून त्यावर मजले चढवले जात आहे. पण त्या वाढीव बांधकामे व झोपड्यांवर कारवाई केली जात नाही. कोळीवाड्यात १४ फुटांपर्यंत बांधकाम करण्यास परवानगी आहे. पण या वाढीव बांधकांमांवर कारवाई केली जात आहे. शिवाय आमच्या स्वतःच्या जागेवर केलेल्या जागांवरही कारवाई केली जात आहे. ही कारवाई योग्य नसून आधी त्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केली जावी, मग कोळीवाड्यातील घरांवर लक्ष द्यावे, असा इशारा तांडेल यांनी दिला आहे.
कोळी समाजात प्रचंड असंतोष
मालाडमधील कोळी समाजाच्या भाजप पक्षाच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी कोळीवाड्यातील कारवाई ही अन्यायकारक असल्याचे सांगितले. मालाड मालवणीमध्ये तीन ते चार मजली घरे बांधली जात आहे. त्या तर सरकारी जागेवर आहेत. पण आम्हा कोळ्यांची तर आमच्याच जागेवर घरे असतानाही ती थोडी वाढवली तरी त्यांच्यावर कारवाई होते. हे आता थांबायला हवे. काही दिवसांपूर्वी मढ मधील कोळीवाड्यात कारवाई करायला आलेल्या महापालिकेच्या पथकाला कोळी समाजाने तीव्र विरोध केला. नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक कोळी महिला समुद्रात नारळ अपूर्ण करायला गेल्या तेव्हा त्यांच्या घरावर महापालिका कारवाई करणार ही बातमी कळताच या धक्क्याने त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोळी समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे. स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नाने आपण महापलिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेऊन ही कारवाई थांबवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community